Friday, April 18, 2025
Latest:
निवडणूकमहाराष्ट्रराष्ट्रीय

लोकसभा निवडणूक पूर्वपीठिकेचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या हस्ते प्रकाशन माध्यमांना निवडणूक विषयक संदर्भांसाठी पुस्तिका उपयुक्त

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर
पुणे, दि. २६:
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ च्या अनुषंगाने पुणे जिल्हा निवडणूक प्रशासनाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या निवडणूक पूर्वपीठिकेचे प्रकाशन प्रधान सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या हस्ते यशदा येथे करण्यात आले.

यावेळी भारत निवडणूक आयोगाचे स्वीप संचालक संतोष अजमेरा, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, आयोगाच्या वरीष्ठ स्वीप सल्लागार अनुराधा शर्मा, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर आदी उपस्थित होते.

पुणे जिल्हा माहिती कार्यालयाने वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे आदी प्रसिद्धी माध्यमांसाठी उपयुक्त संदर्भ असलेल्या या पुस्तिकेची निर्मिती केली आहे. निवडणूक आचारसंहितेबाबत तरतुदी, निवडणूक वार्तांकनासाठी प्रेस कौन्सिलची मार्गदर्शक तत्त्वे, न्यूज ब्रॉडकास्टर्स अँड डिजिटल स्टँडर्डस् ऑथॉरिटीच्या (एनबीडीएसए) मार्गदर्शक सूचना, इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाची (आयएमएआय) स्वैच्छिक आचारसंहिता आदींबाबत सविस्तर माहिती या पुस्तिकेत दिली आहे. राजकीय जाहिरातींच्या प्रमाणीकरणासाठी माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीचे कामकाज (एमसीएमसी), पेड न्यूजबाबत तरतुदी आदी उपयुक्त माहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे.

२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीतील महाराष्ट्राची मतदानाबाबतची ठळक बाबी तसेच पुणे जिल्ह्यातील निवडणुकीची ठळक वैशिष्ट्ये यांचा पुस्तिकेत समावेश आहे. सन १९५१ च्या निवडणुकीपासून २०१९ च्या निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातील लोकसभा मतदार संघातील उमेदवार त्यांना झालेले मतदान, मतदार संख्या, वैध मतांची संख्या, मतदानाची टक्केवारी यांचाही पुस्तिकेत समावेश असल्याने ही पुस्तिका माध्यम प्रतिनिधींना संदर्भासाठी उपयुक्त आहे.

माध्यमांच्या माहितीसाठी जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणुकीच्या अनुषंगाने विविध विषयांचे समन्वय अधिकारी यांचे दूरध्वनी क्रमांक, मतदार मदत कक्ष, जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष यांचे दूरध्वनी क्रमांक, आयोगाच्या विविध तंत्रज्ञान सहाय्यित उपयोजक (ॲप), पोर्टल आदींची माहितीही यात देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!