Wednesday, April 16, 2025
Latest:
जुन्नरपर्यटनपुणे जिल्हामहाराष्ट्रराष्ट्रीयविशेष

लेण्याद्रीच्या पायथ्याशी असलेले पुरातत्व विभागाचे तिकीटघर बौद्ध लेण्याजवळ स्थलांतरित करण्याची खासदार डॉ. कोल्हे यांनी केली मागणी

पुरातत्व विभाग आकारत असलेल्या प्रवेश शुल्काबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन…

महाबुलेटीन न्यूज : आनंद कांबळे 
जुन्नर : लेण्याद्रीला गिरीजात्मक अष्टविनायक गणपती दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून पुरातत्व विभाग आकारत असलेल्या प्रवेश शुल्काबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती मागवून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन आर्केलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या (एएसआय) महासंचालक श्रीमती व्ही. विद्यावती यांनी दिल्याची माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

जुन्नर तालुक्यातील लेण्याद्री येथील गिरीजात्मक गणपती देवस्थान हे अष्टविनायकांपैकी एक आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या भाविकांना पुरातत्व विभागाच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून प्रवेश शुल्क आकारण्यात येत आहे. हे प्रवेश शुल्क आकारण्यास भाविक आणि स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे या प्रवेश शुल्काविरोधात वेळोवेळी स्थानिक ग्रामस्थांनी उपोषण व आंदोलने केली होती. या आंदोलकांना पुरातत्व विभागाने वेळोवेळी तिकीट घर बौद्ध  लेण्याजवळ स्थलांतरित करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यासंदर्भात कोणतीही कार्यवाही आजतागायत झालेली नाही. त्यामुळे लेण्याद्रिच्या पायथ्याशी असलेले पुरातत्व विभागाचे तिकीटघर बौद्ध लेण्याजवळ स्थलांतरित करावे, अशी मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी आज दिल्ली येथील आर्केलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या महासंचालक श्रीमती व्ही. विद्यावती यांची भेट घेऊन केली.

खासदार डॉ. कोल्हे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ए.एस.आय.च्या महासंचालक श्रीमती विद्यावती यांनी लेण्याद्रिच्या पायथ्याशी असलेले पुरातत्व विभागाचे तिकीटघर बौद्ध लेण्याजवळ स्थलांतरित करण्याबाबत आपण अधीक्षक पुरातत्व शास्त्रज्ञ, मुंबई सर्कल यांच्याकडून माहिती मागवून लवकरच निर्णय घेऊ असे सांगितले.

खासदार डॉ. कोल्हे यांनी याविषयी भारत सरकारचे सांस्कृतिक खात्याचा स्वतंत्र कार्यभार सांभाळणारे राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांचीही भेट घेऊन गणेशभक्तांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहेत. त्यामुळे भाविकांना सोसावा लागणारा प्रवेश शुल्काचा भुर्दंड थांबण्याबाबतचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!