लहान बाळाला ढकलल्याच्या रागातून एकाचा खून
लहान बाळाला ढकलल्याच्या रागातून एकाचा खून
महाबुलेटीन न्यूज । चाकण एमआयडीसी
लहान बाळाला ढकलून दिल्याच्या किरकोळ कारणावरून मोई-निघोजे रस्त्यावर चार जणांनी एकाचा धारदार शस्त्राने खून केला असल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २४ ऑक्टोबर रोजी घडली. प्रवीण रामदास गवारी ( रा.मोई, ता.खेड, जि. पुणे ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी महेश उर्फ बंटी जयवंत येळवंडे ( रा. मोई, ता. खेड, जि. पुणे ) यास अटक करण्यात आली असून त्याचे साथीदार फरार झाले आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी की, बाळाला ढकलल्याच्या कारणावरून चौघांनी प्रवीण यास सोबत नेऊन दारू पाजली. त्यानंतर धारदार हत्याराने डोक्यात, हातावर, पायावर मारून त्याचा निर्घृण खून केला. महाळुंगे पोलिस ठाण्यात २४ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री उशिरा तक्रार देण्यात आली असून याप्रकरणी महेश उर्फ बंटी जयवंत येळवंडे ( रा. मोई, ता. खेड, जि. पुणे ) आणि त्याचे दोन ते तीन साथीदार यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश येळवंडे याला महाळुंगे पोलिसांनी अटक केली आहे.
००००