Friday, April 18, 2025
Latest:
ऐतिहासिकजुन्नरपुणे जिल्हामहाराष्ट्रविशेष

किल्ले हडसर वरील कमानी टाक्यात संवर्धन करताना सापडल्या दोन तोफा

किल्ले हडसर वरील कमानी टाक्यात संवर्धन करताना सापडल्या दोन तोफा

महाबुलेटीन न्यूज : आनंद कांबळे 
जुन्नर : जुन्नर तालुक्यातील हडसर किल्ल्यावर कमानी टाक्यातील स्वच्छता करत असताना दोन तोफा सापडल्या असल्याची माहिती प्रा. विनायक खोत यांनी दिली. 

गेली तीन वर्षापासून चाकण एमआयडीसीतील स्कोडा ऑटो फोक्सवॅगन प्रा. लि. मधील ‘मरहट्टे सह्याद्रीचे दुर्ग संवर्धन ग्रुप’ यांच्या मार्फत किल्ले हडसर गडावर संवर्धनाचे काम ‘किल्ले संवर्धन संस्था शिवाजी ट्रेल’ च्या मार्गदर्शनाखाली अविरत चालू आहे. त्यात गडाचा मुख्य दरवाजा, दुसरा दरवाजा पायरी मार्ग, धान्य कोठार तसेच माहिती फलक, दिशा दर्शक फलक, नव्याने तयार करण्यात आलेला गडाचा पूर्ण नकाशा, अशी कामे आत्तापर्यंत करण्यात आली असून २०२१ पासून गडावर असणारे मुख्य पाण्याचं स्रोत असणारे कमानी टाके ग्रुप कडून संपूर्ण गाळमुक्त करण्याचे काम हाती घेण्यात आले. हे टाके ५६ फूट × २३ फूट व खोली १५ फूट अस प्रचंड मोठं असुन या मधील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले. शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी कंपनीतील सर्व जण संवर्धन करण्यासाठी योगदान देतात, तर इतर पाच दिवस निमगिरी गावातील स्थानिकांना कंपनीच्या वतीने रोजगार उपलब्ध करून देण्यात आला असून निमगिरीच्या ग्रामस्थांमार्फत हे कार्य चालू आहे. कारण गेली अनेक वर्षे या ग्रामस्थांनी किल्ले निमगिरीवर काम केले असल्याने त्यांना संवर्धन कसे करावे याबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली होती व त्याच पध्दतीने ते ऐतिहासिक वारसेस धोका न पोहचता काम करत असल्याने किल्ले हडसरवर पण तेच काम करत आहेत.

आज टाकीतील दक्षिणेकडुन गाळ काढत असताना दोन तोफा कमानी टाक्यामध्ये आढळून आल्या असून त्यांना सुरक्षित पणे बाहेर काढण्यात आले आहे. एक तोफ सात फूट लांबीची व बॅरल चार इचं व्यास असुन दुसरी तोफ सात फुट चार इंच लांब व बॅरल व्यास दोन इंच असुन सुंदर मकरमुखाची ही तोफ पहावयास मिळते. या तोफांमुळे नक्कीच किल्ले हडसरचा इतिहास अजून उलगडण्यात मदत होईल, असे मत ‘शिवाजी ट्रेल’ चे विनायक खोत, मेजर रमेश खरमाळे यांनी व्यक्त केले.’मरहट्टे सह्याद्रीचे दुर्ग संवर्धन ग्रुप’ यांच्या मार्फत या तोफांना लवकरच तोफगाडे बसवून त्यांना संरक्षित करण्यात येईल. यावेळी निमगिरी ग्रामस्थ, अमोल ढोबळे, विनायक खोत व रमेश खरमाळे उपस्थित होते. 
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!