खोडद येथे एक हजार रुपयांची लाच घेताना तलाठी सुनील राणे जेरबंद
महाबुलेटीन न्यूज
नारायणगाव (किरण वाजगे) : खोडद (ता. जुन्नर) येथील एका शेतकऱ्यांकडून १ एक हजार रूपयांची लाच घेताना एक तलाठी लाचलुचपत प्रतिबंध पथकाने रंगेहात पकडला आहे.
खोडद येथील सुनील प्रभाकर राणे (वय ५२) असे या तलाठी भाऊसाहेबांचे नाव आहे. येथील तलाठी कार्यालयातच १ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज दुपारी पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने राणे याला रंगेहात पकडले. या प्रकरणी नारायणगाव पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
मांजरवाडी येथील एका तक्रारदार शेतकऱ्याने सहकारी बँकेकडून घेतलेल्या सात लाख रुपये शेती कर्जाची नोंद सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी १ हजार रुपये लाचेची मागणी करून ते स्वीकारताना त्यास रंगेहात पकडण्यात आले आहे.
ही कारवाई लाचलूचपत सापळा पथकाच्या पोलीस निरिक्षक प्रतिभा शेंडगे, महिला पोलीस शिपाई सुप्रिया कादबाने, किरण चिमटे, अभिजित राऊत यांनी परिश्रम घेतले.
तर ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर पोलिस अधीक्षक सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दरम्यान या कारवाई नंतर जुन्नर महसूलच्या लाचखोर तलाठी भाऊसाहेबांच्या इतरही अनेक गोष्टींची चर्चा परिसरात सुरू झाली आहे.