Thursday, April 17, 2025
Latest:
खेडजुन्नरपिंपरी चिचंवडपुणे जिल्हाप्रादेशिकमहाराष्ट्रविशेषसत्कार / सन्मान / पुरस्कार

खेडचे सुपुत्र कर्तबगार आयएएस अधिकारी संकेत भोंडवे यांचा छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्काराने होणार सन्मान..

खेडचे सुपुत्र, कर्तबगार आयएएस अधिकारी संकेत भोंडवे यांचा छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्काराने होणार सन्मान.

महाबुलेटीन न्यूज : हनुमंत देवकर 
चाकण ( पुणे ) : खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा गावचे सुपुत्र व भारत सरकारच्या केंद्रीय सडक परिवहन व राजमार्ग विभागाचे मंत्री नितीन गडकरी यांचे खाजगी सचिव पदावर कार्यरत असलेले संकेत भोंडवे (आयएएस) यांना ‘राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. येत्या १९ फेब्रुवारीला जुन्नर येथे किल्ले शिवनेरीवर होणाऱ्या शिवजन्म सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हस्ते भोंडवे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 

भारत सरकारच्या भुपुष्ट वाहतूक व सडक परिवहन राजमार्ग विभागात कर्तबगार आयएएस अधिकारी म्हणून संकेत भोंडवे खाजगी सचिव पदावर कार्यरत आहेत. हा विभाग केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचेकडे आहे. मध्य प्रदेशात चार ठिकाणी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशा अनेक विभागात त्यांनी अनेक पदावर यशस्वी कार्य केल्याने कर्तबगार आयएएस अधिकारी म्हणून त्यांना भारत सरकारकडून ६ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले, तर मध्यप्रदेश सरकारचे ९ राज्य पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्र राज्यातील किल्ले शिवनेरी विकास परिसर मंडळाचे वतीने दिला जाणारा सन २०२१ चा राज्यस्तरीय ‘छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार’ त्यांना जाहीर झाला.

राज्याचे अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख व आमदार अतुल बेनके अशा ५ जणांच्या कमिटीने भोंडवे यांना पुरस्कार जाहीर केला. मानपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. 

भोंडवे यांनी २००७ ते २०१७ मध्य प्रदेशातील अशोकनगर, उज्जैन, दातीया, हौशिंगाबाद या चार  जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून तर सेओनी जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले. सध्या २०१८ पासून भारत सरकारच्या रस्ते, सडक व परिवहन राजमार्ग विभागात उपसचिव म्हणून काम करतात. खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, जि.प. गटनेते शरद बुट्टे पाटील, माजी सरपंच अमर शिंदे पाटील आदींनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याने निमगाव खंडोबा गावच्या नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!