खेड तालुक्यात नव्याने १० रुग्ण वाढले, कोरोना रुग्णांची एकूण संख्या १४५
खराबवाडीत कोरोनाचा पहिला बळी गेल्यानंतर आणखी तीन जण पॉझिटिव्ह,
खराबवाडी ग्रामस्थांचा आठ दिवस लॉकडाऊन,
खेड तालुका आठ दिवस बंद करण्याची आमदार दिलीप मोहिते यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
महाबुलेटिन नेटवर्क
चाकण : खेड तालुक्यातील कडाचीवाडी येथील एका अडत्याच्या मृत्यूनंतर बुधवारी कोरोनामुळे खराबवाडीतील एका दुकानदाराचा मृत्यू झाला असून गावात आणखी तीनजण पॉझिटिव्ह आढळले आहेत. आज खेड तालुक्यात नव्याने दहा रुग्ण आढळले असून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या १४५ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली. तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील व पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे यांनी खेड तालुका आठ दिवसांसाठी ( लॉकडाऊन ) बंद ठेवण्याची मागणी लेखी पत्राद्वारे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे. तालुक्यात दुपारी ३ वाजेपर्यंत रुग्णांची संख्या १४५ झाली असताना महाळुंगे येथे दुपारनंतर आणखी एक रुग्ण आढळला आहे.
कोरोनाची साखळी रोखण्यासाठी चाकण शहरातील नागरिकांनी १ जुलै पासून तर खराबवाडीतील ग्रामस्थांनी २ जुलै पासून स्वयंस्फूर्तीने बंद पाळला आहे. खराबवाडीत आज मेडिकल व दवाखाने या अत्यावश्यक सेवा वगळता ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला. हा बंद नागरिक ८ जुलै पर्यंत पाळणार आहेत. मात्र गावातील खोल्यांमध्ये राहणारा कामगारवर्ग कंपन्यांमध्ये जात असल्याने नागरिकांचा धोका टळलेला नाही. कारण कंपन्यांमध्ये सातत्याने रुग्ण आढळून येत आहेत. मागील दोन दिवसांपूर्वी खराबवाडीतील एका कंपनीत रुग्ण आढळले आहेत. कडाचीवाडी मधील अडत्याचा भाऊ महाळुंगे येथील एका कंपनीत नोकरीला असताना अनेकांचा संपर्क आल्याने कामगारवर्ग धास्तावला आहे. तर राक्षेवाडी येथील साखरपुडा असणाऱ्या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या ४० जणांना हातावर शिक्के मारून होम क्वारंटाईन केले असल्याची माहिती चाकण नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. नीलम पाटील यांनी दिली आहे. याबाबत नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घेण्याचे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे.