आनंदाची बातमी : खेड तालुक्यासाठी म्हाळुंग्यात १०० ऑक्सिजन बेडचं हॉस्पिटल उभारण्यास मान्यता – २ ऑक्टोबर पासून सुरू..
चाकण एमआयडीसीतील हॅबिटॅट फॉर ह्युमिनिटी इंडिया आणि महिंद्रा कंपनीचा उपक्रम
महाबुलेटीन न्यूज : प्रभाकर जाधव
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता चाकण एमआयडीसीतील हॅबिटॅट फॉर ह्युमिनिटी इंडिया आणि महिंद्रा व्हेईकल्स अँड मॅन्युफॅक्चरर्स लि. यांच्या सीएसआर फंडातून खेड तालुक्यातील कोविडग्रस्त रुग्णांसाठी म्हाळुंगे इंगळे येथे १०० ऑक्सिजन बेडचे हॉस्पिटल उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. खेडचे बीडीओ यांच्यासोबत आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
साधारणतः २ ऑक्टोबर ला ७५ ऑक्सिजन बेड खेड तालुक्यांमध्ये मोफत सेवेसाठी उपलब्ध होऊ शकतील, अशी माहिती खेड तालुक्याचे गट विकास अधिकारी अजय जोशी यांनी दिली.
खेड तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला असून बहुतांश बऱ्याच रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळत नाही, ऑक्सिजन बेडसाठी पुणे किंवा पिंपरी-चिंचवडला धाव घ्यावी लागते. प्रसंगी ऑक्सिजन बेड न मिळाल्याने काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
तालुक्यातील रुग्णांची ही गैरसोय लक्षात घेऊन गट विकास अधिकारी अजय जोशी यांनी हॅबिटॅट फॉर ह्युमिनिटी इंडिया आणि महिंद्रा कंपनी यांच्या सोबत आज बैठक घेतली. या बैठकीमध्ये महाळुंगे येथे १०० आॅक्सीजन बेडचं हाॅस्पिटल उभारण्यात दोन्ही कंपन्यांनी मान्यता दिली.
कंपनीच्या लोकांना आपण सहसा महाळुंगे कोविड सेंटर मध्ये भरती करुन घेत नसल्याने, कंपनीची याबाबत थोडी नाराजी होती, त्यांचे म्हणणं होतं की, महिंद्रा बऱ्याच वर्षांपासून CSR activities करते, तरीही आमच्या लोकांना तिथे जागा का मिळत नाही..? कंपनीकडे त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र उपचार करवून घेण्याची क्षमता असते. महाळुंगे कोविड सेंटर हे सर्व सामान्यांसाठी आहे, असे समजावून सांगितले असता नाराजी दूर होऊन त्यांनी १०० बेडला मान्यता दिल्याचे गट विकास अधिकारी अजय जोशी यांनी महाबुलेटीनच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.