खेड तालुका पंचायत समितीच्या सभापती पदी शिवसेनेचे भगवान पोखरकर १२ मते मिळवून बहुमताने विजयी, सेना-राष्ट्रवादीचं तालुक्यात जमलं, सेनेत गटबाजी…
शिवसेनेची गटबाजी चव्हाट्यावर, मात्र सेना, राष्ट्रवादी, काँग्रेसने जपली महाआघाडीची मैत्री, भाजपचेही मिळविले एकमत…
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे भगवान पोखरकर बहुमताने विजयी झाले असल्याची माहिती पीठासीन अधिकारी संजय तेली यांनी दिली. पोखरकर यांना १२ मते व त्यांच्या विरोधात अर्ज दाखल केलेल्या सुनीता सांडभोर यांना २ मते मिळाली, त्यामुळे शिवसेनेची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. मात्र आवाजी मतदान प्रक्रियेत शिवसेना ६, राष्ट्रवादी ४, काँग्रेस १ अशी मते मिळवून आपली राज्यातील महाआघाडीची मैत्री अबाधित जपली शिवाय भाजपचे ही एक मत मिळवून १२ मतांचे बहुमत मिळविले. त्यामुळे सभागृहात यावेळी अनोखी आघाडी पहावयास मिळाली. तालुक्यातील आजी-माजी आमदारांचे सख्य नसले तरी खालच्या फळीतील नेत्यांनी या निवडणुकीत मैत्रीपूर्ण संबंध दाखविले आहेत.
पंचायत समितीच्या राजा शिवछत्रपती सभागृहात पार पडलेल्या निवडणुकीत सभापती पदासाठी शिवसेनेतून भगवान पोखरकर, सुनीता सांडभोर व वैशाली जाधव यांचे अर्ज आले. त्यापैकी वैशाली जाधव यांनी माघार घेतली. पंचायत समिती मध्ये शिवसेनेचे ८, राष्ट्रवादीचे ४, काँग्रेस १ व भाजप १ असे बलाबल आहे. यातील सेनेची दोन मते विरोधी उमेदवाराला मिळाली.
यावेळी नवनिर्वाचित सभापती भगवान पोखरकर यांचा सत्कार करण्यात आला. विद्यमान आमदार यांना विश्वासात घेऊन नवीन इमारतीचे काम लवकरच मार्गी लावू, तसेच मतभेद व गतटत बाजूला ठेऊन विकास कामाला प्राधान्य देऊ, असे आश्वासन सभापती पोखरकर यांनी दिले.