खेड पंचायत समिती सभापती अविश्वास ठराव मंजूर, ११ विरुद्ध ३ हात वर करून झाले मतदान… ● अविश्वास ठरावाच्या बाजूने शिवसेनेचे ६, राष्ट्रवादीचे ४ तर भाजपच्या एक, तर ठरावाच्या विरोधात शिवसेनेचे दोन व काँग्रेसच्या एक सदस्याने केले मतदान…
खेड पंचायत समिती सभापती अविश्वास ठराव मंजूर, ११ विरुद्ध ३ हात वर करून झाले मतदान…
● अविश्वास ठरावाच्या बाजूने शिवसेनेचे ६, राष्ट्रवादीचे ४ तर भाजपच्या एक, तर ठरावाच्या विरोधात शिवसेनेचे दोन व काँग्रेसच्या एक सदस्याने केले मतदान…
महाबुलेटीन न्यूज : प्रभाकर जाधव
राजगुरूनगर : खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात ११ विरुद्ध ३ याप्रमाणे अविश्वास ठराव मंजूर झाला, अशी माहिती पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली. १४ पैकी ११ पंचायत समितीच्या सदस्यांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावाविरोधात सोमवारी (दि. ३१ मे ) विशेष सभा बोलावण्यात आली होती.
खेड पंचायत समितीच्या १४ सदस्यांपैकी शिवसेनेच्या भगवान पोखरकर व ज्योती अरगडे आणि काँग्रेसचे सदस्य अमोल पवार यांनी अविश्वास ठरावाच्या विरोधात, तर शिवसेनेच्या सुनिता सांडभोर, वैशाली जाधव, सुभद्रा शिंदे, मच्छिंद्र गावडे, अमर कांबळे, अंकुश राक्षे आणि राष्ट्रवादीचे अरुण चौधरी, मंदा शिंदे, वैशाली गव्हाणे, नंदा सुकाळे व भाजपाचे विद्यमान उपसभापती चांगदेव शिवेकर अशा ११ सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने हात वर करुन मतदान केले.
पोखरकर यांच्याविरोधात पुण्यातील एका रिसाँर्टवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली होती. मात्र अविश्वास ठरवाच्या मतदानास येण्याची सभापती पोखरकर यांना न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार पोखरकर हे पोलीस बंदोबस्तात सभेसाठी आले होते. याच पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडु नये, यासाठी पोलिसांनी राजगुरुनगर मध्ये मोठा बंदोबस्त ठेवला होता.
“मी पंचायत समिती ईमारत बांधकामाबाबत आमदार दिलीप मोहिते यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने त्यांनी हे षडयंत्र रचले, असा आरोप सभापती भगवान पोखरकर यांनी केला.
“या मतदान प्रक्रियेदरम्यान सुभद्रा शिंदे व मच्छिंद्र गावडे या सदस्यांनी सुरवातीला हात वर केले नव्हते. ईतर सदस्यांनी सांगितल्यावर त्यांनी हात वर केला, त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत”, असे काँग्रेस सदस्य अमोल पवार यांनी सांगितले. “स्व. आमदार सुरेश गोरे यांच्या स्वप्नांना ईतर सदस्यांनी सुरुंग लावला”, असा आरोप करताना ज्योती आरगडे यांना अश्रू अनावर झाले.
“सभापती पोखरकर हे ३१ डिसेंबर २०२० रोजीच राजीनामा देणार होते. त्यांनी शब्द पाळाला असता, तर ही वेळ आलीच नसती,” असे मत शिवसेनेच्या सुनिता सांडभोर यांनी व्यक्त केले.
“सभापती पोखरकर हे कामकाजात महिलांना विश्वासात घेत नव्हते. कायम अरेरावीची भाषा वापरत. पत्रकार परिषदेत आढळराव यांनी आमची बाजू घेतली नाही”, अशी खंत शिवसेनेच्या वैशाली जाधव यांनी व्यक्त केली.
“पोखरकर हे ईमारत बांधकामाचा बागलबुवा करीत आहेत. ईमारत ही ठरल्या जागेवर व्हावी, हीच आम्हा सर्वांची ईच्छा आहे. काम करण्यासाठी पद हवेच, असे काही नसते. पोखरकर यांनी रिसॉर्टमध्ये महिला सदस्यांना बाथरूममध्ये घुसून मारहाण केली. ही स्वर्गीय आमदार सुरेश गोरे यांची संस्कृती नव्हती. या सर्व प्रक्रियेत आमची प्रतिमा मलिन झाली”, अशी शिवसेना सदस्य अंकुश राक्षे यांनी प्रतिक्रिया दिली.
खेड पंचायत समिती सभापती पदावरुन सुरु झालेल्या वादात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना सुरु होऊन माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टिका केली होती.
त्यातच आमदार मोहितेंनी आढळराव पाटलांना लक्ष केले होते. हा शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचा वाद पक्षश्रेष्ठीपर्यत पोहचला होता. मात्र महाविकास आघाडीत समावेश असणाऱ्या दोन्ही पक्षांनी स्थानिक राजकारणात जाहिरपणे कुठलीच ठोस भुमिका घेतली नाही.
खेड पंचायत समितीत सभापती पदावरुन सुरु झालेल्या राजकीय नाट्याने गुन्हेगारीचे रुप धारण केल्याने कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी मागील चार दिवसांपासून राजगुरुनगर शहरात पोलिसांसह दंगल विरोधी पथकाचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आज राजगुरुनगर शहरात संचारबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.
दरम्यान, पंचायत समितीमध्ये शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत असताना देखील अविश्वास ठराव संमत झाला. यामुळे पक्षातील गटबाजी उघड झाली. माजी खासदार शिवाजीराव आढळराव परिस्थिती हाताळण्यात अयशस्वी ठरले, अशी चर्चा तालुक्यात होत आहे. यावेळी पंचायत समितीच्या पाचशे मीटर परीसरात संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते. त्यामुळे राजगुरूनगरवासीयांना वाहतूक समस्येला सामोरे जावे लागले.
०००००