खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व सचिव यांच्या सह्यांचे काढलेले अधिकार बेकायदेशीर : आमदार दिलीप मोहिते ● सभापती विनायक घुमटकर यांचे काम अतिशय उत्तम, प्रामाणिक असुन उल्लेखनीय : आमदार मोहिते पाटील
खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व सचिव यांच्या सह्यांचे काढलेले अधिकार बेकायदेशीर : आमदार दिलीप मोहिते
● सभापती विनायक घुमटकर यांचे काम अतिशय उत्तम, प्रामाणिक असुन उल्लेखनीय : आमदार मोहिते पाटील
महाबुलेटीन न्यूज । सुनिल थिगळे
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मासिक सभेमध्ये सभापती व सचिव यांचे सह्यांचे अधिकार काढून घेतले, हे बेकायदेशीर असून बँकेने फक्त संचालक मंडळाच्या ठरावावर सह्यांचे अधिकार गृहीत धरले, त्या बॅंकेच्या बाबत ही चौकशी करणार असल्याची माहिती आमदार दिलीप मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीची मासिक सभा ही ८ ऑगस्ट रोजी घेण्यात आली होती. यावेळी बाजार समितीचे संचालक एकत्र येत विद्यमान सभापती विनायक घुमटकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत त्यांच्यासह सचिव बाळासाहेब धंद्रे यांचे सह्यांचे अधिकार काढुन घेतले, यानंतर आमदार दिलीप मोहिते यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासा दिला आहे.
संचालकांचे हे कृत्य बेकायदेशीर असुन पणन कायद्यानुसार असे अधिकार संचालक मंडळाला नाहीत. मात्र सभापती घुमटकर यांचे अधिकार अबाधीत आहेत. तसेच यासाठी संचालकांनी केलेली चौकशी समिती सुध्दा नियमबाह्य असून सभापती घुमटकर यांचे काम अतिशय उत्तम, प्रामाणिक असुन उल्लेखनीय आहे, असा खुलासा आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केला. बाजार समितीतील समर्थक असलेल्या माजी सभापतींसह काही संचालकांच्या विरोधात आमदार मोहिते पाटील यांनी सोमवारी ( दि २३ ऑगस्ट ) पत्रकार परिषद घेऊन जाहीर भाष्य केल्याने तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या समर्थक संचालकांचे बहुमत आहे. १६ पैकी १२ संचालक मोहिते पाटील यांच्या पॅनेलमधुन निवडून आले आहेत. गेल्या पाच वर्षात मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीचा कारभार सुरू आहे. संचालक मंडळाची मुदत संपली आहे. मात्र कोरोनाच्या काळात १ वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे. या काळात कोणत्याही प्रकारचा धोरणात्मक निर्णय घेऊ नये, असे संकेत आहेत.
बाजार समितीची मासिक सभा ८ ऑगस्टला राजगुरूनगर येथे झाली होती. त्यात विकास कामे व आडते लायसन्स देण्यावरून सभापती विनायक घुमटकर यांना लक्ष करून संचालक मंडळाने सह्यांचे अधिकार काढुन घेतले. या कारवाईत आमदार समर्थक व सभापती होऊन गेलेल्या ज्येष्ठ संचालकांनी पुढाकार घेतला. त्याला विरोधी पॅनेलच्या संचालकांनी समर्थन दिले. त्यावरून आमदार मोहिते पाटील म्हणाले की, “मला वा पक्षाच्या जबाबदार व्यक्तीला माहिती न देता बाजार समितीच्या बैठकीत संचालकांनी घेतलेली ही भूमिका माझ्या व पक्षाच्या विरोधात आहे. त्याची चौकशी केली जाईल. सभापती विनायक घुमटकर यांनी बाजार समितीचे उत्पन्न वाढवणारी अनेक प्रलंबीत कामे पूर्ण केली. त्या प्रत्येक कामात मी लक्ष दिले आहे. गेली पंधरा वर्षे मी पणन महामंडळ संचालकपदी असल्याने अनेक कामांना मंजुरी मिळाली. त्याचा खऱ्या अर्थाने उपयोग घुमटकर यांच्या काळात झाला.”
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अरुण चांभारे, सुखदेव पानसरे, माजी सभापती रमेश राळे, लक्ष्मण टोपे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल नायकवडी उपस्थित होते.
००००