खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना लोकसभेत पहिल्या पदार्पणातच संसदरत्न पुरस्कार…
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना लोकसभेत पहिल्या पदार्पणातच संसदरत्न पुरस्कार…
महाबुलेटिन न्यूज नेटवर्क ( विशेष प्रतिनिधी ) : चेन्नई येथील प्राईम पॉइंट फाऊंडेशन आणि इ – मॅगेझीनतर्फे संसदरत्न पुरस्कार शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांना जाहीर झाला आहे. शनिवारी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. सतराव्या लोकसभेमध्ये पहिल्या पदार्पणातच खा. डॉ. कोल्हे यांना पहिला संसद रत्न पुरस्कार मिळणार आहे.
लोकसभेत खा. डॉ. कोल्हे यांनी लोकसभेच्या सभागृहातील चौदा चर्चासत्रांत सहभाग नोंदवला. आतापर्यंत मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांसह विविध विषयांवर पावणे तीनशे प्रश्न डॉ. कोल्हे यांनी उपस्थित केले. संसदेत उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केली असून प्रभावी भाषणांद्वारे छाप त्यांनी पाडली. शिरूर लोकसभा मतदारसंघातील पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे, बैलगाडा शर्यत, राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र स्थापनेचा विषय त्यांच्या प्रयत्नातून मार्गी लागला. कोरोना काळात परदेशात अडकलेल्या शेकडो विद्यार्थी व पर्यटकांना पुन्हा भारतात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. यासोबतच ॲलोपथी, आयुर्वेद, युनानीसह सर्व पॅथींचा इंटिग्रेटेड विचार करण्याचा मुद्दा त्यांनी प्रभावीपणे मांडला.
अधिवेशनात उपस्थिती, चर्चासत्रातील सहभाग आणि उपस्थित केलेल्या प्रश्न इत्यादी निकषांवर पुरस्कारासाठी खासदारांची निवड केली जाते. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरु करण्यात आल्याचे फाऊंडेशनचे के. श्रीनिवासन यांनी कळविले आहे.
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ए. के. पटनायक यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार शनिवारी (दि.२०) प्रदान करण्यात येणार आहे.
—–

