काव्यमंच : वानवळा
वानवळा.
=======
गाभुळल्या पिकामधी
सोनसळी झालं रान,
गंध केशरी उन्हाला
तेव्हा चढतं उधान…!!
हुळहुळत्या मनाची
रानभर हिरवळ,
धरतीच्या उदरात
एक उसासली कळं…!!
धुंद वा-याची झुळूक
पानोपानी सळसळ,
घाम गाळल्या देहात
पुन्हा संचारत बळं….!!
देह पांगळा पांगळा
तरी घालतोय घाट,
तुला वानवळा द्याया
विठु चालतोय वाट…!!
रास भरता खळ्यात
नभी चांदण्यांचा खेळ,
ओसांडल्या वावरात
विसावली सांजवेळ…!!
©️ प्रकाश बनसोडे
चाकण पुणे