Thursday, April 17, 2025
Latest:
काव्यमंचविशेष

कविता : “SSC बॅच”

कविता : “SSC बॅच”
—————-

प्रत्येकाची SSC ची बॅच असते
कोण कुठे आहे माहिती नसलं,
कधीच भेटणं होत नसलं तरी
ती प्रत्येकाच्या मनात असते

SSC च्या बॅचची एक गंमत असते
पन्नाशी पार केलेला तो
सासरा झालेला असतो,
पन्नाशी पार झालेली ती
सासू झालेली असते,
तरी सुद्धा SSC च्या बॅचमध्ये
अजूनही तो मुलगा असतो
आणि ती मुलगी असते

SSC च्या बॅचमधल्या आठवणी
सुखद असते त्यांची उजळणी
तिने त्याच्याकडे पाहिलेलं असतं
त्याने तिच्याकडे पाहिलेलं असतं
बस्स इतकच, बघण्या बघण्यातच
वर्ष सरलेलं असतं

SSC चा निकाल लागतो,
नवीन प्रभा घेऊन सूर्य उगवतो
प्रत्येकाचं विश्व वेगळं होतं,
त्याचे मित्र बदलतात
तिचेही मित्र बदलतात
एका गोष्टीची सुरूवात होण्यापूर्वीच
तिला विराम येतो

नवीन वयात, नवीन विश्वात,
नवीन मित्रांत, गप्पांच्या ओघात,
पुसटशा स्पर्शात,
प्रेम म्हणजे काय
समजू लागलेलं असतं

आता ओढही असते
आणि सहवासही असतो
त्याला कुणीतरी आवडते
तिला कुणीतरी आवडतो
कुणी सहजीवनाची
शिडी एकत्र चढतो,
कुणी पडतो, कुणी धडपडतो

पुढच्या आयुष्यात प्रत्येकाची
आपली बाग असते
त्याच्या बागेत
तो झाड होऊन जगतो,
तिच्या बागेत
ती वेल होऊन जगते

वेलीवर कळ्या येतात
त्यांची फुले होतात
झाडाचा वृक्ष होतो
सावली देत ताठ उभा असतो
पण त्या उभं रहाण्यातही खरं तर
वेलीचाच त्याला आधार असतो

वर्ष सरत असतात,
कळ्यांची फुले होतात
वाऱ्यावर डुलत असतात
बहरत असतात

कधी वाऱ्याचं वादळही होतं
सगळ्या बागेला हलवून जातं
झाड मात्र ताठ असतं,
कसं हलल पण नाही
म्हणून ताठरपणे पहात असतं
पण तीच ती वेल असते
स्वतः वाकते
म्हणून झाडाला
मोडण्यापासून वाचवते

आता आयुष्याच्या सायंकाळी
फेसबुक व्हाट्सॲप्
हाच विरंगुळा असतो !
फेसबुकवर शोध घेता घेता
व्हाट्सॲपवर
SSC च्या बॅचचा ग्रुप तयार होतो
इतकी वर्षे बंद असलेला
कोनाडा हळूच उघडतो
हृदयाच्या कुपीत बंद ठेवलेल्या
अत्तराचा सुगंध
अजूनही तसाच असतो

आता मात्र गप्पांच्या मैफिलीत
जुन्या मित्र मैत्रीणींच्या
आठवणींना उजाळा येतो
कारण त्या अत्तराच्या
कुपितला सुगंध
पुन्हा हवाहवासा वाटतो

मनोमन मन म्हणत असतं
अशी वेळ यावी
केव्हातरी कुठेतरी ती
ओझरती तरी दिसावी
तेव्हाची ती नजरानजर
एकदा तरी व्हावी,
ती एकच नजर
पुढील जीवनाची
शिदोरी बनून जावी

त्यातच एक आशेचा किरण दिसतो
SSC बॕचचा
भेटण्याचा दिवस ठरतो
त्या दिवशी प्रत्येकजण नव्यानं
जुनंच दिसण्याचा प्रयत्न करतो
प्रत्येक मुलगा मुलगी
मला ओळखेल
हा भाबडा विश्वास असतो

त्याच वर्गात, त्याच बेंचवर
प्रत्येकजण पुन्हा एकदा
बसणार असतो
आणि आठवणींच्या झऱ्यांचा
महासागर होणार असतो

भेटीगाठी होत असतात
जुन्या आठवणी निघत असतात
त्यातच तिची त्याची
नजरानजर होते आणि
एका क्षणात सर्व काही सांगून जाते
त्याला आणि तिलाही
नवीन भेटीत
खुप काही बोलायचं असतं
पण उजाळा देण्यासारख
SSC या वर्षात
काही घडलेलच नसतं

तो तीला तिच्या
टोपण नावाने हाक मारतो,
ती अवघडते पण आक्षेपही नसतो
कारण एकच दिवसाचा सहवासही
पुढच्या संपूर्ण प्रवासाचा
साथी होणार असतो

निरोप घ्यायची वेळ येते
दोन समांतर रेषा
काही क्षणांकरता एकत्र होऊन
पुन्हा एकदा समांतर जाऊ लागतात
पुढील जन्मी नक्की भेटण्याची
नजरेनेच ग्वाही देतात

हीच ती SSC ची बॅच
कायमचं घर करून रहाते
आयुष्याच्या भैरवीला
साथीला गात रहाते …
SSC ची बॅच….

————
— अज्ञात कवी
————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!