दसरा विशेष काव्यमंच : खरं सोन्याचं हे गाणं…
☘खरं सोन्याचं हे गाणं☘
गाऊ म्हणती हे गाणं
शमी-आपट्याची पानं
बोल मूक बोलीचे हे
म्हणे जगावं सुखानं॥धृ॥
भेदभाव विसरुन
रहा सारे एकोप्यानं
माणसात माणूसकी
जागविली ह्या वृक्षानं॥१॥
व्हावं माणसाहुनी रे
काय वृक्षांनी शहाणं
वृक्ष तोडून पाडून
काय केलं माणसानं॥२॥
उपकारा ची न जाणं
नाही ठेवलेही भान
कसं म्हणावं माणूस
माणसाला दुनियानं॥३॥
हिर्व्यागार समृध्दीचं
शमी-आपट्याचं गाणं
दया शांतीचं हृदय
याचं भरलं सोन्यानं॥४॥
म्हणूनच नांव सोनं
याला दिलं दुनियानं
सण दसर्याचा मोठा
केला याच्या पाचोळ्यानं॥५॥
– निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे, धुळे