कार्तिकी यात्रा विशेष : माऊली मंदिरात लाखो दिव्यांचा झगमगाट, आळंदी शहरात मात्र शुकशुकाट
यंदा प्रथमच इंद्रायणी नदीत भाविकांना स्नानास बंदी, शहराला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांवर कडक पोलीस बंदोबस्त
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
आळंदी देवाची : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७२४ व्या समाधी सोहळ्यानिमित्ताने प्रथमच संपूर्ण मंदिर बाहेरुन आणि आतुन भव्य दिव्य आकर्षक लाईटींग करण्यात आली आहे.
भाविकांपेक्षा यंदा मंदीरात दिव्यांची गर्दीच दिसून येत असून प्रथमच लाखो वारकरी भाविक भक्तांच्या उपस्थित होणारा समाधी सोहळा यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित स्वरूपात साजरा होणार आहे. कार्तिकी यात्रेच्या इतिहासात प्रथमच संपूर्ण आळंदी शहर आणि पंचक्रोशीतील गावात संचार बंदी मुळे शुकशुकाट दिसून आहे.
यात्रेसाठी यंदा बाहेरून कोणतीच दुकाने आलेली नाहीत. तसेच मंदिर परिसरातील हार, फुले, तुळशीच्या माळा, खेळणी, धार्मिक पुस्तके, हॉटेल व्यवसायिक, मिठाईची दुकाने अशी अनेक दुकाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आली आहेत. आळंदीकरांसाठी अत्यावश्यक असणारी दवाखाने, मेडिकल, किराणामाल, भाजीपाला आणि फळे हीच दुकाने चालू राहणार आहेत.
इंद्रायणी नदीवर कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने होणारी गर्दी यावर्षी मात्र असणार नाही. यंदा प्रथमच इंद्रायणी नदीमध्ये भाविकांना स्नानासाठी बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण इंद्रायणी परिसरात शुकशुकाट दिसून येत आहे. पोलीस बंदोबस्तासाठी असलेले पोलीस सोडले तर, कोणी त्या भागात दिसत नाही. मंदिर परिसरात बॅरिकेट लावून मंदीर परिसर बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे मंदिर परिसरात कोणीही येऊ नये, असे आवाहन आळंदी पोलीस स्टेशन मार्फत करण्यात आले आहे. आळंदी शहराला जोडणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.