Saturday, August 30, 2025
Latest:
आदिवासीकृषीखेडदिल्लीपर्यटनपुणे जिल्हाप्रशासकीयप्रादेशिकमहाराष्ट्रमुंबईरायगडराष्ट्रीयविशेषशिरूर

महाबुलेटीन ब्रेकिंग न्यूज : कर्जत-भीमाशंकर ऐवजी कर्जत-शिरूर महामार्ग होणार : दिलीप मेदगे

 कर्जत-भीमाशंकर ऐवजी कर्जत-शिरूर महामार्ग होणार : दिलीप मेदगे

महाबुलेटीन न्यूज । हनुमंत देवकर
उरण-पनवेल-कर्जत-वांद्रा-पाईट-शिरोलीमार्गे राजगुरूनगर- पाबळमार्गे शिरूर असा रस्ता तयार करण्याच्या सर्वेक्षणाच्या कामाला नुकतीच मंजुरी देण्यात आली असून सदर कामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या महत्त्वाच्या बदलाची माहिती पुणे-नाशिक महामार्गचे समन्वयक व पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य इंजि. श्री. दिलीप मेदगे यांनी दिली. 

अनेक दिवस सुरू असलेली कर्जत भीमाशंकर ही चर्चा यामुळे थोडी मागे पडणार आहे. राज्य शासनाच्या म्हणण्यानुसार मराठवाड्यातून येणारे हेवी ट्रॅफिक हे लोणावळा, खंडाळा घाटातील ताण कमी करण्यासाठी नवीन घाटाची आखणी करून त्याची निर्मिती करण्यात येणार आहे. एकशे चाळीस किलोमीटरचा हा प्रस्तावित रस्ता असून मावळ तालुक्यातून 22 किलोमीटर व खेड तालुक्यातील 72 किलोमीटर व उर्वरीत अंतर शिरूर तालुक्यामधील असे एकंदरीत एकशे चाळीस किलोमीटरचा हा रस्ता करण्याचा महाराष्ट्र शासनाचा मानस आहे. सुरुवातीला दहा मीटरने या रस्त्याची रुंदी पूर्ण करण्यात येणार असून, 45 मीटर रुंदीने याचे भूसंपादन करण्यात येणार आहे. साडेबारा कोटी रुपयांच्या निविदेची मान्यता मिळाली असून मोनार्च कन्सल्टंट आणि सर्वेअर्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीची निविदा स्वीकारण्यात आली आहे. या सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीकडून नुसता आराखडा मंजूर करून घेण्यासोबत यातील फॉरेस्ट आणि नॉन फॉरेस्ट जमिनींच्या भूसंपादनाच्या विषय परवानग्या घेण्याची जबाबदारी सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीवर देण्यात आली आहे. याचा संपूर्ण आराखडा पूर्ण झाल्यानंतर याच्या इस्टिमेटच्या नुसार या कामाला लागणारी रक्कम ही निश्चित होईल. व त्यानंतर या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाकडून याची मंजुरी घेण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांच्याकडे आपण पाठपुरावा करू, असे श्री. दिलीप मेदगे यांनी सांगितले. 

आंबोली ते औंढे, कुडे, घोटवडी, धामणगाव, शिरगाव या वीस किलोमीटरसाठी केंद्रीय मंत्रालयाकडून सी आर एफ मधून निधीची मागणी करण्यात येणार आहे. याबाबत पश्चिम भागातील एक शिष्टमंडळ नितीनजी गडकरी यांची भेट घेणार आहे. भीमाशंकर-कर्जत रस्त्याची अनेक वर्षांपासून मागणी करणारे व पश्चिम भागातील ज्येष्ठ नेते स्वर्गीय बापूसाहेब शिंदे यांचे नाव आंबोली-शिरगाव-भीमाशंकर या रस्त्याला देण्यासाठीचा ठराव करून मागणी करण्यात येणार आहे. सद्यस्थितीमध्ये पढररवाडी-वांद्रे-विऱ्हाम-आंबोली या रस्त्यावरती कामे सुरू असून दहा मीटर रुंदीच्या रस्त्यांची निर्मिती महाराष्ट्र शासनाच्या बजेटमधून सुरू आहे. सात ते आठ कोटी रुपयांच्या रकमेची कामे प्रगतीपथावर ती आहेत.

या भागातून जाणाऱ्या या रस्त्यामुळे आंबोली, पाईट, किवळे, शिरोली या गावांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना या निमित्ताने विनंती करण्यात येते की, आपल्या जमिनी कृपा करून विकू नका. हा महामार्ग झाल्यानंतर आपल्या जमिनींचा व्यावसायिक वापर करून आपली कुटुंबे स्थिरस्थावर होऊ शकतात, अशी विनंती श्री. दिलीप मेदगे यांनी निवेदनातून केली आहे.

● हा होणारा रस्ता खेड तालुक्यातील पश्चिम भागाचा विकासाचा महामार्ग होणार आहे. यामुळे भीमाशंकरला येणाऱ्या पर्यटक ,भाविकांना अत्यंत कमी अंतरातून भीमाशंकरला पोचता येईल. स्थानिकांना आपला शेतमाल विशेषता भात, कडधान्य, रानमेवा, करवंदे, जांभूळ तसेच हॉटेल व्यवसाय, फार्म हाऊसेस यांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!