धक्कादायक : अंधश्रद्धेचा घृणास्पद प्रकार – कांद्याचे रोप येऊ नये म्हणून जेष्ठ महिलेच्या शेतात लिंबे, मंगळसूत्र, नारळ, अंडी व काळ्या बाहुलीची पूजा करून जादूटोणा व मंत्र तंत्राचा वापर
६५ वर्षीय विधवा महिलेच्या कांदा रोपावर तणनाशक फवारून नुकसान, अज्ञात इसमा विरूद्ध तक्रार दाखल
महाबुलेटीन न्यूज : किरण वाजगे
नारायणगाव : कांदळी तालुका जुन्नर येथील एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेच्या कांदा रोपावर अज्ञात माथेफिरूने तणनाशक फवारून सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान केले आहे. ही घटना ९ डिसेंबर ते १४ डिसेंबर या दरम्यान घडली असावी, अशी माहिती या वृद्ध महिलेची मुलगी सुरेखा निघोट यांनी दिली. याशिवाय या महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन अज्ञात माथेफिरूने या महिलेच्या शेतामध्ये लिंबे कापून ठेवली. तसेच मंगळसूत्र, नारळ, अंडी त्याचप्रमाणे काळ्या बाहुलीची पूजा करून जादूटोणा व मंत्र तंत्राचा वापर केला आहे.
याबाबत हिराबाई हरिभाऊ फुलवडे (रा. सुतार ठीके, कांदळी, तालुका जुन्नर) यांनी नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी अज्ञात इसमाला शोधून त्या विरुद्ध ठोस कारवाई करणार असल्याचे सांगितले.
दरम्यान जुन्नर तालुक्यात यापूर्वी द्राक्ष बाग, डाळिंबाची बाग अज्ञात माथेफिरुंनी छाटून उद्ध्वस्त केली आहे. तसेच आता कांदा चोरी, बटाटा चोरी, त्याचप्रमाणे कांदा रोपांच्या चोरी पाठोपाठ कांदा रोपांवर तणनाशक फवारणी यासारखा घृणास्पद प्रकार घडला आहे. अशा माथेफिरुंवर कारवाई होईल का असा सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे. या माथेफिरूंवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.