Sunday, April 20, 2025
Latest:
आंतरराष्ट्रीयमहाराष्ट्रराष्ट्रीयविशेष

बॉलीवूडचे महानायक, ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांचे निधन, वयाच्या 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बॉलीवूडचे महानायक, ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांचे निधन, वयाच्या 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
● श्वास घेण्यास अडचण येत असल्याने दिलीपकुमार यांना मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
● आज पहाटे उपचार सुरू असताना दिलीप कुमार यांनी जगाचा निरोप घेतला. 

महाबुलेटीन न्यूज । विशेष प्रतिनिधी
मुंबई  : हिंदी चित्रपटसृष्टीतील (Hindi film industry) ट्रॅजिडी किंग (Tragedy King) दिग्गज अभिनेते मोहमद युसूफ खान (Veteran actor Mohammad Yusuf Khan) उर्फ दिलीप कुमार (Dilip Kumar) यांचं निधन झालं आहे. ते 98 वर्षांचे होते. दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने, त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital) दाखल करण्यात आले होते. अखेर उपचारादरम्यान, त्यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांनी भारतीय सिनेसृष्टीला अनेक गाजलेले चित्रपट दिले आहेत. यामध्ये नया दौर, मुघल-ए-आझम, देवदास,, राम और श्याम, अंदाज, मधुमती आणि गंगा जमुना या चित्रपटांचा समावेश आहे. दिलीप कुमार यांनी त्यांचा शेवटचा चित्रपट 1998 ला ‘किला’ हा चित्रपट केला होता.    

काही दिवसांपूर्वी दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास अडचण येत असल्याने त्यांना मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल केल्यापासूनच त्यांचे चाहते आणि संपूर्ण बॉलिवूड त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते. पण, आज पहाटे उपचार सुरू असताना दिलीप कुमार यांनी जगाचा निरोप घेतला. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. दरम्यान रुग्णालयात काही दिवस ठेवल्यानंतर सायरा बानो यांनी दिलीप कुमरा यांना घरी नेण्याची इच्छा व्यक्ती केली. त्यानुसार रुग्णालयाने दिलीप कुमार यांना नुकताच डिस्चार्ज दिला होता.

दिलीप कुमार यांना पहिल्यांदा 6 जून रोजी ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते. तेव्हा त्यांची प्रकृती स्थिर होती. या काळात त्यांच्या निधनाच्या अफवाही पसरल्या होत्या. तेव्हा दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी  दिलीप कुमार यांच्या ट्विटरवरुन ट्विट करत या अफवांचे  खंडन केले होते. तसेच दिलीप कुमार यांना 11 जूनला डिस्चार्ज देण्यात आला होता. दिलीप कुमार यांना गेल्या काही वर्षांपासून किडनीचा आणि न्यूमोनियाचा त्रास होता. दरम्यान दिलीप कुमार यांचा 94 वा वाढदिवस हा रुग्णालयात साजरा करण्यात आला होता.
——————————————————-

दिलीपकुमार यांचा अल्पपरिचय.
जन्म – ११ डिसेंबर १९२२ रोजी पेशावर येथे.
हिंदी चित्रपटांमध्ये अभिनयाची तहज़ीब आणि तरक्की असलेले अभिनेते म्हणजे दिलीपकुमार….
दिलीप कुमार यांना बॉलिवूडमधील ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून ओळखलं जायचे. पेशावर मधील किस्सा खवानी बाजारात एका फळविक्रेत्या पठाण कुटुंबात जन्माला आलेल्या युसूफ खान यांनी कधीही हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनय करण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. वडिलांनी व्यवसायाचे बस्तान बसविल्यानंतर इतर कुटुंबीयांसोबत मुंबईला आल्यावरही किशोरवयीन युसूफच्या तसे मनातही कधी आले नव्हते. उलट लवकरात लवकर स्वत:च्या पायावर उभे राहून बारा मुले, इतर नातेवाईक आणि पै-पाहुण्यांचे करता करता थकून गेलेल्या अम्मीचे कष्ट काही प्रमाणात कमी करता यावेत यासाठी लवकरात लवकर कमावता होणे याच एका उद्देशाने झपाटलेल्या युसूफने एकदा वडिलांशी उडालेला खटका मनाला लावून घेत तिरमिरीत घर सोडून थेट पुणे गाठले. तिथे लष्करी कॅन्टीनमध्ये मॅनेजरचा साहाय्यक म्हणून केलेल्या नोकरीने त्यांना आपणही पैसे कमवू शकतो, हा आत्मविश्वास मिळवून दिला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लष्करी कॅन्टीनचे व्यवस्थापन बदलले आणि युसूफ खान जमा केलेले पाच हजार रुपये घेऊन घरी परतले. नोकरी करावी की परंपरागत व्यवसाय, या द्विधा मन:स्थितीत दादर येथे एका परिचिताकडे निघालेल्या युसूफ खान यांना चर्चगेट स्थानकात डॉ. मसानी हे स्नेही भेटले. ख्याली खुशालीच्या चौकशीत युसूफ नोकरीच्या शोधात असल्याचे समजल्यावर डॉ. मसानी यांनी त्यांना माहीम येथे सोबत येण्याची गळ घातली. युसूफही त्यांच्या आग्रहाखातर माहीम येथील बॉम्बे टॉकीज स्टुडिओत दाखल होऊन देविकाराणी समोर उभे राहिले. देविकाराणीने राजबिंडे व्यक्तिमत्त्व आणि उर्दूवरील प्रभुत्व या भांडवलावर युसूफ खान यांना महिना बाराशे रुपये पगारावर बॉम्बे टॉकीजच्या चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची ऑफर दिली. युसूफ आणि डॉ. मसानी या दोघांनाही हे अनपेक्षित होते.

देविकाराणींच्या सूचनेवरूनच ‘दिलीपकुमार‘ या टोपण नावाने ‘ज्वार भाटा’ या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर त्यांचे १९४४ मध्ये पदार्पण झाले. मात्र हा चित्रपट अपयशी ठरला होता. त्यानंतर आलेला ‘मिलन’ हा त्यांचा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आणि त्यानंतर त्यांनी कधीचं मागे वळून पहिलं नाही. दिलीप कुमार यांनी त्यांच्या सहा दशकाच्या अभिनय कारकिर्दीत अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या. त्यातील ‘अंदाज’, आन, ‘देवदास’, ‘आजाद’, ‘मुगल-ए-आजम’ आणि सामाजिक विषयावर आधारित चित्रपट ‘गंगा जमुना’ यांसारख्या चित्रपटात अभिनय केला. १९५७ मध्ये दिलीप कुमार व वैजयंती माला यांच्यावर चित्रित झालेल्या ‘माँग के साथ तुम्हारा, मैने माँग लिया संसार…’ या गीतातील शब्दांनी तरुणाईला भारून टाकले होते. १९७६ मधील तिहेरी भूमिका असलेला ‘बैराग’ हा नायक म्हणून दिलीपकुमार यांचा अखेरचा चित्रपट. त्यानंतर पाच वर्षे चित्रपटसृष्टीपासून दूर राहिलेल्या दिलीपकुमार यांनी मनोज कुमार यांच्या ‘क्रांति’ पासून चरित्र अभिनेता म्हणून काम करण्यास सुरुवात केली. ‘शक्ति’, ‘विधाता’,’मजदूर’,’दुनिया’,’मशाल’, ‘कर्मा’, ‘सौदागर’ अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपल्या उत्तुंग अभिनयाचे दर्शन घडवले. दिलीप कुमार यांनी १९९८ साली ‘किला‘ या चित्रपटात शेवटची भूमिका साकारली. भारत सरकारने त्यांना पद्मभुषण, दादासाहेब फाळके, पद्मविभूषण पुरस्काराने गौरविले. पाकिस्तान सरकारनेही त्यांना १९९७ साली सर्वोच्च नागरिक पुरस्कार ‘निशान-ए-इम्तियाज’नेही सन्मानित केले गेले. असे म्हणतात ‘मुघल-ए-आझम’चे चित्रीकरण चालू असताना दिलीपकुमार आणि मधुबाला एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते, सायरा बानूशी झालेला विवाह हे विधिलिखित होते. हे वैवाहिक जीवन प्रदीर्घ काळ टिकेल, असा दिलीपकुमार यांचा विश्वास होता. दिलीपकुमार आणि अभिनेत्री सायरा बानू यांचेही लग्न त्या काळी गाजले. कारण लग्नाच्या वेळी दिलीपकुमार पेक्षा सायरा बानूचे वय खूपच कमी होते. दिलीप कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली…💐💐💐
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!