जेव्हा खेडचे आमदार ‘आरटीओ’ला फटकारतात…
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क : खेड तालुक्यातील एका वाहन धारकाला आरटीओच्या नियमांचा फटका आणि त्यानंतर लोकप्रतिनिधींनी केलेला फोन आरटीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उचलण्यास दाखवलेली नकारघंटा आणि त्यानंतर सदर लोकप्रतिनिधींनी आरटीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची घेतलेली झाडाझडती….
याबाबतची चर्चा खेड तालुक्यात चांगलीच रंगली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, खेड तालुक्यातील एका व्यक्तीचे वाहन चोरट्यांनी चोरून नेले होते. त्यामुळे आपले रोजीरोटी असलेले वाहन चोरीला गेल्यामुळे वाहन धारक अक्षरशः हतबल झाला होता. पोलिसांनी मोठ्या जीकरीने तपास करून सदर वाहन चोरट्यांकडून हस्तगत केले. त्यानंतर सदर वाहन कोर्टाच्या आदेशानंतर वाहन मालकाने हस्तगत केले. मात्र आपल्या घराकडे वाहन घेऊन येत असताना आरटीओ भरारी पथकाच्या कचाट्यात सापडले आणि त्यावर कारवाई करून दंड भरण्याची मागणी त्यांनी केली. मात्र वाहन चालकाकडे पैसेच नसल्यामुळे त्यांनी दंड भरण्यास असमर्थता व्यक्त केली. याबाबत वाहन चालकाने खेड तालुक्याचे आमदार दिलीपराव मोहिते यांना फोन केला. याबाबत आमदार मोहिते यांनी पिंपरी चिंचवड आरटीओचे परिवहन अधिकारी अतुल आदे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी फोन उचलला नाही. त्यानंतर त्यांनी एका आरटीओ प्रतिनिधीच्या फोनवरून त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तो फोन तातडीने उचलला. आपला फोन का उचलला नाही, असे आमदार मोहिते यांनी त्यांना विचारून “लोकप्रतिनिधींचे फोन आपण उचलत नाहीत, तर आपण सर्वसामान्य नागरिकांची कसे वागत असाल?” असा जाब त्यांनी विचारला. तसेच आपल्या नियमात बसून गरीब वाहनचालकावर बाका प्रसंग गुदरला आहे. त्याला सहकार्य करावे, अशी मागणी आमदार मोहिते यांनी केली.
याबाबत आरटीओ चे परिवहन अधिकारी अतुल आदे यांच्याशी संपर्क केला असता, तो होऊ शकला नाही.
————————————–
पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयाच्या कामाचा पूर्णपणे बोजवारा उडाला असल्याचे नागरिकांनी मला वारंवार सांगितले आहे. याठिकाणी वरिष्ठ अधिकार्यांचा वचक नसल्यामुळे जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यातील नागरिकांना कामासाठी हेलपाटे मारावे लागत आहे. याबाबत आपण राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे तक्रार करणार आहोत.- दिलीपराव मोहिते, आमदार खेड