इंदापूरात शहरात दोन दिवसात दोन युवकांची आत्महत्या

महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
इंदापूर : शहरात दोन दिवसात दोघांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. पहिली घटना सोनाईनगरमध्ये घडली. ही शनिवारी उघडकीस आली, तर व्यंकटेशनगर मध्ये घडलेली दुसरी घटना आज ( दि.१२ ) सकाळी उघडकीस आली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती नुसार, सोनाईनगर भागातील प्रतिक सुरेश सोनी ( वय २३ वर्षे ) या युवकाने आपल्या रहात्या घरातील छताच्या पंख्यास गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याचा प्रकार घडला. ही घटना शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत त्याचा चुलतभाऊ निमेश जितेंद्र सोनी ( रा. सिध्देश्वर मंदीर शेजारी, मेनरोड इंदापूर, जि. पुणे ) याने इंदापूर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशीरा खबर दिली. या प्रकरणात मृतदेहाजवळ चिठ्ठी चपाटी अथवा इतर काही आढळून आलेले नाही. आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही.
दुसरी घटना व्यंकटेशनगर येथे घडली. जुबेर इरफान बागवान ( वय ३५ वर्ष, सध्या रा. व्यंकटेशनगर, इंदापूर, मूळ रा. वैराग, ता. बार्शी जि. सोलापूर ) या इसमाने घराच्या छतावरील कॉलमच्या गजाला बेडशिटच्या साहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार सकाळी साडेनऊ वाजता उघडकीस आला. त्याचे चुलत सासरे सादिक इब्राहिम बागवान ( रा.व्यंकटेशनगर, इंदापूर ) यांनी या संदर्भात इंदापूर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. जुबेर बागवान हा सादिक बागवान यांचे थोरले बंधु मुसा बागवान यांचा जावई होता. गेल्या सात-आठ वर्षापासुन तो त्यांच्याच कुटुंबात रहात होता. भाजीपाला, फळ विक्रीचा व्यवसाय करुन तो कुटुंबाची उपजिविका करत होता. त्याला दारु व गांजाचे व्यसन होते. शनिवारी रात्री जेवण झाल्यानंतर तो नेहमीप्रमाणे घराच्या छतावर झोपण्यासाठी गेला होता.
आज ( दि. १२ जुलै ) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सादिक बागवान यांची सून आसमा ही जुबेर यास नाश्ता देण्यासाठी घराच्या छतावर गेली असता तिला घराच्या छतावरील कॉलमच्या गजाला बेडशिटच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेतील जुबेरचा मृतदेह दिसला. तिने ही माहिती घरातील लोकांना दिली, असे दिलेल्या खबरीत बागवान यांनी म्हटले आहे. जुबेरच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. इंदापूर पोलीस या दोन्ही घटनांचा तपास करीत आहेत.