महाबुलेटीन ब्रेकिंग न्यूज : गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा, कोर्टाच्या CBI चौकशीच्या आदेशांनंतर देशमुख यांचा निर्णय…
● शरद पवार, अजित पवार आणि अनिल देशमुख यांची सिल्व्हर ओक बैठक झाली, यात देशमुखांनी गृहमंत्री पद सोडण्याची तयारी दर्शवली त्याला शरद पवारांनीही ग्रीन सिग्नल दिला
Maharashtra Home Minister Anil Deshmukh has met the CM Uddhav Thackeray to tender his resignation:
महाबुलेटीन न्यूज : किशोर कराळे
मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे. परमवीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने सोमवारी दिले. त्यानंतर काही वेळातच अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून आपल्या पदाचा राजीनामा दिला, अशी माहितीही नबाब मलिक यांनी दिलेली आहे.
परमबीर सिंग यांनी हायकोर्टामध्ये या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती, ही मागणी मान्य करत हायकोर्टाने सीबीआयमार्फत प्राथमिक चौकशी करून पंधरा दिवसात कायदेशीर कारवाईचे आदेश दिले आहे. आपल्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी सुरू असल्याने त्या पदावर राहणे योग्य नाही, म्हणून आपण राजीनामा देऊ इच्छितो, असे अनिल देशमुख यांनी सांगितल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील अनिल देशमुख यांची राजीनामा देण्याची मागणी मान्य केली. त्यानंतर ते मुख्यमंत्र्यांकडे रवाना झाल्याची माहिती नबाब मलिक यांनी दिलेली आहे.
देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या गृहखात्याचा कारभार नियमाप्रमाणे तूर्तास मुख्यमंत्र्यांकडे असेल, पण यावर लवकरच तिन्ही पक्ष मिळून चर्चा करु आणि कुणाकडे जबाबदारी द्यायची याचा निर्णय घेऊ, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. तसेच देशमुख यांच्यावरील सर्व आरोप खोटे आहेत, पण नैतिकता म्हणून त्यांनी राजीनामा दिल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.