Friday, May 9, 2025
Latest:
राष्ट्रीयव्यापार/वाणिज्य

“गुगल भारतात करणार ७५ हजार कोटीची गुंतवणूक” : सुंदर पिचई

मोदींबरोबरच सकाळी चर्चा झाल्यानंतर केली घोषणा
महाबुलेटीन नेटवर्क : 
गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांनी गुगल भारतामध्ये डिजीटलायझेशनसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली आहे. पुढील पाच ते सात वर्षांमध्ये ही गुंतवणूक केली जाणार असल्याचे पिचई यांनी स्पष्ट केलं आहे. पिचई यांनी आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. त्यानंतर पिचई यांनी एका ब्लॉग पोस्टमधून ही घोषणा केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनेही यासंदर्भातील माहिती दिली आहे.
“आम्ही आज गुगल फॉर इंडिया मोहिमेअंतर्गत १० बिलीयन डॉलरच्या (७५ हजार कोटी रुपये) गुंतवणूकीची घोषणा केली. भारताच्या डिजीटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आम्ही ही घोषणा करत आहोत. आम्हाला यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजीटल इंडियाच्या व्हिजनमुळे पाठिंबा मिळाला त्यासाठी त्यांचे धन्यवाद. त्याचप्रमाणे मंत्री रवीशंकर प्रसाद आणि मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांचेही आभार,” असं ट्विट पिचई यांनी केलं आहे.
गुगलकडून करण्यात येणारी गुंतवणूक ऑपरेशन्स व डिजिटल क्षेत्रातील पायाभूत सुविधा यांच्याशी संबंधित असणार आहे असंही पिचई यांनी म्हटलं आहे.
मोदींनी सकाळी पिचई यांच्यासोबतच्या बैठकीची माहिती दिली होती.
“भारतामध्ये वेगवेगळे प्रयोग सुरु असून त्याला इतर जगालाही फायदा होऊ शकतो. मात्र भारताचा डिजीटल प्रवास अद्यापही सुरुच आहे. अजूनही भारतामधील लाखो लोकं स्वस्त इंटरनेटच्या सेवेपासून दूर आहेत. सर्वांसाठी व्हॉइस इनपूटची सेवा उपलब्ध करुन देण्यापासून ते सर्व भारतीय भाषांमध्ये कंप्युटींगचा पर्याय उपलब्ध करुन देण्यापर्यंत अनेक काम बाकी आहेत. नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी याची गरज आहे. म्हणून आम्ही मागील काही वर्षांपासून वेगवगेळ्या माध्यमातून भारतामध्ये गुंतवणूक केली आहे.” असं पिचई आपल्या ब्लॉगमध्ये म्हणाले आहेत.
“आज भारतामधील सोयी सुविधांचा दर्जा वाढवण्यासाठी डिजीटलायझेशन फंडची घोषणा करताना मला आनंद होत आहे. आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून पुढील पाच ते सात वर्षांमध्ये भारतात ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहोत. आम्ही इक्विटीच्या माध्यमातून, भागीदारीमधून तसेच ऑप्रेशनल क्षेत्रामधून गुंतवणूक करणार आहोत. याच प्रमाणे डिजीटलायझेशनसंदर्भातील बांधकाम आणि इकोसिस्टीम (व्यवस्था) निर्माण करण्यासाठी गुंतवणूक करण्यात येईल. आम्हाला भारताच्या भविष्यावर आणि त्याच्या डिजीटल अर्थव्यवस्थेवर विश्वास आहे हेच या गुंतवणूकीमधून दिसून येत आहे,” अस पिचई यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!