घोडेगाव मध्ये ४५ पथके करणार घरोघरी सर्वेक्षण
महाबुलेटीन न्यूज : अविनाश घोलप
घोडेगाव : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पुणे यांचे निर्देशानुसार आंबेगाव तालुक्यातील मौजे घोडेगाव येथील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व बाधीत रूग्णांचा वाढता आलेख नियंत्रीत करण्यासाठी तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तालुका आंबेगाव तर्फे उपविभागीय दंडाधिकारी उपविभाग मंचर यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनांक ११/९/२०२० रोजी एका दिवशी सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे.
सदर दिवशी ४५ पथके प्रत्येक घरोघरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण करणार आहेत. त्याचदिवशी संशयित रूग्णांची रॅपिड अँटीजन टेस्ट एकूण ३ सेंटर मध्ये होणार आहे. याकामाकरिता ९ पर्यवेक्षक, ३ अँटीजन स्वेब कलेक्शन सेंटर, ३ टेस्टिंग टीम, १५ टेस्टिंग स्टाफ, १० पोलिस, ३ रुग्णवाहिका, २२ अतिरिक्त कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी स्वयंसेवकांची मदत देखील घेतली जाणार आहे. तसेच खाजगी लॅब्स यांचे सहकार्य मिळणार आहे. तरी घोडेगाव शहरातील सर्व नागरिकांनी यावेळी पथकाला खरी माहिती द्यावी. १०० टक्के व्यक्तींनी घरीच थांबावे.
सर्वेक्षण पथकाचे सूचनेवरुन तात्काळ सांगितलेल्या स्वँब कलेक्शन टेस्टिंग सेंटर ठिकाणी टेस्टिंग करून घ्यावे. पुढील अहवाल प्राप्त होताच सूचनेनुसार सीसीसी/डीसीएचसी मध्ये दाखल करण्यात येईल. याकामी सदर सर्वेक्षण मोहीमेस सर्व घोडेगाव नागरिकांनी सहकार्य करावे, असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.