Thursday, April 17, 2025
Latest:
आंबेगावआरोग्यकोरोनापुणे जिल्हाविशेष

घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात कोरोना मदत कक्ष सुरू

 

महाबुलेटीन न्यूज : अविनाश घोलप
घोडेगाव : कोविडच्या काळात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर आलेला ताण हा अगदीच भयानक आहे. अगोदरच आपल्याकडील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कमकुवत असताना कोविडने मोठे आव्हान या आरोग्य व्यवस्थेसमोर निर्माण केलेले आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी, डॉक्टर यांची जशी तारेवरची कसरत सुरू आहे. तसेच रुग्णांची देखील मोठी धांदळ उडालेली पहायला मिळत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे येथील अनुसंधान ट्रस्ट – साथी या संस्थेने सरकारी दवाखान्यात काही ठिकाणी रुग्णांच्या मदतीसाठी त्यांना आरोग्य विषयक योग्य ती माहिती देण्याकरिता मदतकक्ष सुरू केलेले आहे.

आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हा मदतकक्ष अनुसंधान ट्रस्ट – साथी या संस्थेच्या सहकार्यातून व आदीम संस्थेच्या स्थानिक संयोजनातून दि.१८ ऑगस्ट २०२० पासून सुरू करण्यात आला आहे. या मदतकक्षामध्ये संस्थेच्या अर्चना गवारी व अनिल सुपे हे दोघेजण उपलब्ध असून ते रुग्णांना सेवा पुरवत आहेत.

या कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना मदत कशी करता येईल, हे जाणून घेऊन त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असून यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे.
१) रुग्णांना शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करणे.
२) रुग्णांना संबंधित वार्ड दाखवून देणे, दोन रुग्णांमध्ये किमान ५ ते ७ फुटांचे अंतर कसे राहील यासाठी प्रयत्न करणे. या अनुषंगाने रुग्णांचे समुपदेशन करणे.
३) वृद्ध रुग्णांना संबंधित विभागात पोचवण्यास मदत करणे.
४) गरोदर महिलांना व त्यांच्या नातलगांना विविध शासकीय योजनांची माहिती देणे.
५) विद्यार्थ्यांना मेडिकल सर्टिफिकेट मिळावे म्हणून सहकार्य करणे.
६) रुग्णांचे समुपदेशन करून त्यांची कोरोना विषयक भीती कमी करण्यासाठी प्रयत्न करणे.
७) रुग्णांना महात्मा फुले योजनेची माहिती देणे याबरोबरच विविध सरकारी योजनांची माहिती देणे.

मदत कक्षाच्या माध्यमातून गेली महिनाभर रुग्णांना ही सेवा दिली जात आहे व यापुढे ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील सात ते आठ महिने ही सेवा सुरू राहणार आहे. यामुळे सरकारी कर्मचारी, डॉक्टर यांच्यावरील ताण काही प्रमाणात का होईना कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या मदत कक्षाला रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. चिंचोलीकर, डॉ. राहुल जोशी, डॉ.गणेश शेंगाळे, डॉ.कोकणे सर, डॉ. डामसे मॅडम तसेच रुग्णालयातील सर्व स्टाफचे सहकार्य मिळत आहे. तर अनुसंधान ट्रस्ट – साथी संस्थेचे श्री. भाऊसाहेब आहेर याकामी सतत मार्गदर्शन करत आहेत.

याबरोबरच या मदतकक्षाच्या वतीने एक हेल्पलाईन नंबर 9322790037 उपलब्ध करून दिलेला आहे. संबंधित नंबरवर आंबेगाव तालुक्यातील नागरिक आरोग्यविषयक माहिती घेण्यासाठी सकाळी ९ ते ५ या वेळेत फोन करून माहिती घेऊ शकतात. आदीम संस्थेचे राजू घोडे, अविनाश गवारी व डॉ.अमोल वाघमारे हे या उपक्रमाचे संयोजन व व्यवस्थापन करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!