Thursday, August 28, 2025
Latest:
कोल्हापूरतंत्रज्ञानमुलाखत

गावातील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावा : विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचे निर्देश

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर
पुणे, दि.११ : पुणे विभागीय लोकशाही दिनात कोल्हापूर जिल्ह्यातील पिशवी गावच्या महिलेने केलेल्या तक्रारीची दखल घेत विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी गावातील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने तात्काळ विल्हेवाट लावा, असे स्पष्ट निर्देश संबंधिताना दिले.

पिशवी गावातील कचरा गायरान जमिनीवर टाकण्यात येतो. त्याबाबत गावातील रहिवाशी प्रियंका इंगवले यांनी गावाची स्वच्छता, गावातील नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरणाचा विचार करून ग्रामपंचायतीत तक्रार केली होती. कार्यक्षेत्रात निर्माण होणारा कचरा उघड्यावर टाकल्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो तसेच नागरिक व प्राण्यांना आरोग्यविषयक विविध समस्या निर्माण होऊन आजाराला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांचे म्हणणे होते.

ग्रामपंचायतीने तक्रारीची दखल न घेतल्याने त्यांनी जिल्हास्तरीय लोकशाही दिनात याविषयीची तक्रार दाखल केली. तिथेही त्यांच्या तक्रारीचे निराकरण पूर्णत: न झाल्याने त्यांनी विभागीय लोकशाही दिनात अर्ज सादर केला. सामान्य नागरिकांच्या हितासाठी प्रयत्न करणाऱ्या या महिलेचे पर्यावरण रक्षणासाठीचे प्रयत्न लक्षात घेवून विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे निर्देश दिले.

विभागीय आयुक्तांच्या या आदेशामुळे पिशवी गाव स्वच्छ राहण्यास मदत होणार असून गायरान जमिनीवरील कचरा दूर होणार आहे. विभागीय आयुक्तांनी संवेदनशीलतेने या प्रश्नाबाबत आवश्यक कार्यवाही तातडीने केल्याबद्दल श्रीमती इंगवले यांनी डॉ. पुलकुंडवार यांना धन्यवाद दिले.

पुणे विभागीय लोकशाही दिनात ग्रामपंचायत क्षेत्रातील अतिक्रमीत इमारती व त्याचे भाडे करार, शासनाच्यावतीने विकासकाला देण्यात आलेल्या विविध परवानग्या, कृषी विभागाकडून लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ, गायरान जमीनीवरील कचरा प्रश्न तसेच पर्यायी जमिनी देणे असे एकूण ६ प्रकरणे प्राप्त झाली होती. त्यापैकी ५ प्रकरणावर सुनावणी घेऊन ती निकाली काढण्यात आली आहे.

यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, उपायुक्त वर्षा लड्डा-उंटवाल, राहुल साकोरे, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर तसेच सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!