Sunday, April 20, 2025
Latest:
जुन्नरपुणे जिल्हाविशेष

फिल्ट्रेशन प्लॅंटची पाणीवहन नलिकेची पडदी कोसळली

महाबुलेटीन न्यूज
जुन्नर ( आनंद कांबळे ) : जुन्नर नगरपालिकेची सन २०११ पासुन अर्धवट अवस्थेत असलेल्या पाणीपुरवठा योजनेतील
फिल्ट्रेशन प्लॅंटच्या नव्याने पुनरउभारणी व चाचणी सुरू असताना बांधकामातील जवळपास ८० फूट लांबीची पाणी वाहुन नेणाऱ्या चॅनेलची दक्षीण बाजुकडील छोटी पडदी कोसळली.

मागील आठ वर्षापासुन जुन्नरकर नागरीकांना फिल्टर केलेले शुद्ध पाणी मिळत नव्हते. म्हणुन नगरपालीकेने फिल्ट्रेशन प्लॅंटच्या नव्याने पुनरउभारणी करण्याच्या १ कोटी चाळीस लाख रुपये खर्चाच्या कामाची सुरवात पाच महिन्यांपुर्वी केली होती. दि. ६ रोजी दुपारी ३ च्या सुमारास, फिल्टरेशन हॅापर मध्ये पाणी सोडून चाचणी सुरू होती. त्यावेळी पाणी चॅनेलमधुन पाणी फ्लेक मिक्सर मध्ये जात असताना पाण्याचा दाब वाढल्याने एका बाजूची जवळपास ८० फूट लांबीची आणि चार फूट उंचीची पडदी कोसळली. पाच महिन्यांपूर्वीच ही पडदी बांधण्यात आली होती. पाण्याचा दाब जरी वाढला तरी दाब सहन करण्याची पडदीची क्षमता पाहीजे होती; परंतु पडदी कोसळल्याने निकृष्ट दर्जाचे काम झाले असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. २०११ मध्ये ९ कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना केंद्र शासनाच्या आर्थिक योगदानातुन सुरू करण्यात आली होती. परंतु लोकप्रतिनिधी व ठेकेदार यांच्या अभद्र युतीने हे काम अर्धवट राहीले. योजनेचा खर्च वाढला ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात आली. नंतर काळ्या यादीत टाकण्यात आले, परिणामी जुन्नरकर नागरीकांना अशुद्ध पाणी पिणे नशीबी आले होते.

सद्यस्थितीत सहा पैकी २ हॅापर कार्यान्वित करून शहराला शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या हेतूने हॅापर दुरूस्ती पाईपलाईन आणि तत्सम कामांसाठी मार्च २०२० मध्ये १ कोटी ४० लाख रूपये मंजूर होऊन हे काम सुरू करण्यात आले होते.

हा प्रकार पाण्याच्या अतिरिक्त दाबामुळे ..
——-
फिल्टरेशन प्लँट ची चाचणी घेत असताना, १७५ अश्वशक्ती दाबाने पाणी सोडले होते. मात्र पाणीवहन चॅनेल मधुन ते पुढे फ्लेक मिक्सरमध्ये जाताना ते सहा इंचाच्या दोन पाईपमधून जात होते. त्यामुळे चॅनेलच्या पडदीवर पाण्याचा दाब वाढल्याने पडदी कोसळली. तांत्रिक चुकीने हा प्रकार झाला आहे. त्याची योग्य ती दुरूस्ती करण्यात येईल व काम पुर्ण केले जाईल.
– विवेक देशमुख( बांधकाम विभाग प्रमुख )

लोकप्रतिनिधी, ठेकेदार प्रशासन यांची अभद्र युतीने नगरपालीकेत भ्रष्ट कारभार सुरु असल्याने निकृष्ट कामे होत आहेत. फिल्टरेशन प्लँटची चाचणी घेत असताना बांधकाम विभागाचे अधिकारी, मुख्याधिकारी यांनी स्वतः उपस्थित राहणे गरजेचे होते, परंतु हे आधिकारी उपस्थित राहीले नाहीत. — मधुकर काजळे ( अध्यक्ष सजग नागरीक मंच जुन्नर)

नवीन कामात असे प्रकार होणे, हे कामाच्या गुणवत्तेत शंका निर्माण करणारे आहे. यापुढे काम दर्जेदार झाले नाही तर कारवाईसाठी पाठपुरावा करणार .
— भाऊ कुंभार ( नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!