एकनाथ खडसे बाहेर पडताच भाजपला 10 आमदारांचं खिंडार ?
एकनाथ खडसे बाहेर पडताच भाजपला 10 आमदारांचं खिंडार ?
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क : किशोर कराळे
मुंबई : गेले काही दिवस फक्त चर्चा सुरु असताना अचानक एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला. ( बुधवारी 21 ऑक्टोबर रोजी एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला ) फक्त राजीनामा देऊन ते शांत बसले नाहीत, तर जितक्या दिवसांची त्यांनी नाराजी होती, त्या सर्व दिवसांची नाराजी पत्रकारांसमोर बोलून दाखवली. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी खुलेपणाने टिका केली. या दिवसाचा शेवट होतो न होतो, तोच त्यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना अजून एक वक्तव्य केलं, ज्यामुळे राजकीय क्षेत्रात पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.
मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत असताना फक्त एकटा प्रवेश न करता, माझ्यासोबर शेकडो कार्यकर्ते, भाजपचे काही माजी आमदार प्रवेश करतील, असंही वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं आहे. फक्त इतकंच नाही, तर भाजपचे सध्याचे 10 ते 12 आमदार माझ्या संपर्कात असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं आहे. भाजपमध्ये असताना रोखठोक आणि बंडखोर आमदार म्हणूनही एकनाथ खडसे यांची ओळख आहे, जे बोलतात ते करून दाखवतात, असंही त्यांच्या बाबतीत बोललं जात आहे.
सध्या भाजपमध्ये असलेले काही आमदार पक्षांतर बंदीमुळे माझ्यासोबत पक्षांतर करणार नाहीत, पुन्हा निवडणुका झाल्यास त्या त्यांना परवडणार नाहीत. त्यामुळे ते सध्या माझ्यासोबत येणार नाहीत. माझ्या संपर्कात असलेले भाजपचे काही माजी आमदार माझ्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश करतील. त्यांच्यासोबतच नगराध्यक्ष, सहकार क्षेत्रातील पदाधिकारीही राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असंही एकनाथ खडसे यांनी वृत्तसंस्थांशी बोलताना म्हटलं आहे.