एका बदलीची गोष्ट….. पेढे पंढरीत मग खेडमध्ये जेवणावळी !
शिवाजी आतकरी
महाबुलेटिन न्यूज नेटवर्क
एखाद्या अधिकाऱ्याच्या बदलीचा इतका खोल विषय होऊ शकतो! होय, अलीकडे काहीही होऊ शकते. पंढरपूरच्या तहसीलदार वैशाली वाघमारे यांची खेडला बदली झाली आणि बदलीच्या आनंदाने पंढरीत पेढे वाटले गेले. या बातम्या जशा व्हायरल झाल्या तशाच स्वरूपाच्या मीम्स सोशल मीडियावर खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांच्या बदलीनंतर व्हायरल झाल्या. त्यातील एक पोस्ट म्हणजे, “पंढरपुरात पेढे वाटले जात असतील तर खेडमध्ये तर बदलीच्या आनंदाप्रीत्यर्थ जेवणावळीच उठल्या पाहिजे….” एकूणच दोन्ही महिला अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर जो आनंद व्यक्त होत आहे, त्याबद्दल वरिष्ठ महसूल अधिकारी आणि एकूणच महसूल प्रशासनाने गांभीर्याने घेण्याची बाब आहे. या प्रकाराने महसूल विभागात किती भोंगळपणा सुरू आहे, याची लक्तरे वेशीवर टांगली आहेत.
पंढरपूरच्या तहसीलदार खेडला बदलून आल्या. त्यांच्या बदलीनंतर पंढरीत आनंद, समाधान व्यक्त झाले. पेढे वाटले गेले. या प्रतिक्रिया सहज घेण्यासारख्या निश्चित नाही. अशा प्रतिक्रियेपर्यंत लोक येत असतील तर तेथे झालेल्या कार्यालयीन कारभाराचा विषय गंभीर आहे. अवैध वाळू उपसा, भ्रष्ट कार्यालयीन कारभार, सर्वसामान्यांची अडवणूक यावरून पंढरपूरकर वैतागले होते. या अडवणुकीचा आणि भ्रष्ट कारभाराचा कळस झाला म्हणूनच नागरिकांच्या नैसर्गिक प्रतिक्रिया उमटल्या.
वैशाली वाघमारे खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या शिफारशीने आणि प्रचंड पाठपुराव्याने खेडला आल्या. अर्थात खेडला तहसीलदार कोण असावे, यासाठी आमदारांनी इतर पर्याय वैशाली वाघमारे यांच्या आगोदर तपासले होते. एकूणच वाघमारे यांच्या नावास आमदारांनी दिलेल्या पसंतीवर आश्चर्य व्यक्त होत आहे. कारण सुचित्रा आमले या खेडच्या तहसीलदार यांच्याप्रमाणे वैशाली वाघमारे यांच्याबद्दलही तक्रारी होत्या.
खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या तक्रारीवरून सुचित्रा आमले यांची बदली झाली. त्यामुळे मॅटमध्ये जरी त्या गेल्या तरी त्यांचा टिकाव कितपत लागेल याबद्दल साशंकता आहे. दरम्यान अवैध उत्खनन, सातबारा दुरुस्ती प्रकरणे, केसेस आणि एकूणच कार्यालयीन भ्रष्ट कारभार याबद्दल तक्रारी झाल्या. तहसीलदार आमले यांच्यापासून जीवाला धोका असल्याची तक्रार आमदार दिलीप मोहिते यांनी पोलिसात दिली हाती. हा ट्विस्ट पुढे वाढत गेला. खेडच्या तहसीलदारांचा बदलीचा विषय पुढे प्रतिष्ठित झाला. मोहिते पाटील विरोधकांनी सुचित्रा आमले यांची बाजू घेत हा विषय राजकीय केला. एकूणच आमले यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली.आमदार मोहिते पाटील यांनी या बदली प्रकरणात सरशी मिळवली.
एक महिला अधिकारी जाऊन दुसऱ्या महिला अधिकारी खेडला आल्या. महिला अधिकाऱ्यांच्या एजंट आणि घरच्या मंडळींनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कामकाजात ढवळाढवळ नाही केली तर अडचणी येत नाहीत.अशी काळजी नवीन तहसीलदार घेतील अशी आशा आहे. अन्यथा कारकीर्द वादग्रस्त होणार, हे अटळ आहे. विजया पांगारकर, रोहिणी आखाडे या महिला तहसीलदार आपल्या कामकाजाने वेगळेपण ठेवून गेल्या. मात्र सुचित्रा आमले यांची बदली एक गोष्ट बनून राहिलीय, हेही तितकेच खरे!