आरोपीचा जामीन करण्यासाठी एक लाखाची लाच स्वीकारताना पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचाऱ्यास अटक, पुणे एसीबीची कारवाई, पाच लाखाची केली होती मागणी…
महाबुलेटीन न्यूज
वडगाव मावळ : न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीचा जामीन करण्यासाठी ५ लाखाच्या लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पथकाने एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई शनिवारी (दि.६) दुपारी ३:२५ वा. कामशेत पोलीस स्टेशनमध्ये झाली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक बाळासाहेब नेवाळे यांना दि.२१/०२/२०२१ रोजी फसवणूक प्रकरणी अटक केली. वडगाव मावळ न्यायालयाने दि.२५/०२/२०२१ पर्यंत पोलीस कोठडी दिली. वडगाव मावळ न्यायालयात जामीनसाठी मदत करण्यासाठी ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानुसार दि.२३/०२/२०२१ रोजी अडीच लाख रुपये दिले. २५/०२/२०२१ रोजी न्यायालयात जामीन मिळवून देण्यासाठी काहीच मदत केली नाही. नेवाळे यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांची येरवडा पुणे कारागृहात रवानगी केली.
नेवाळे यांचा जामीन करण्यासाठी पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम व पोलीस कर्मचारी महेश दौंडकर यांनी काहीच मदत न केल्याने त्यांना उर्वरित रक्कम देण्याचे टाळले असता, नेवाळे यांचा दि.१०/०३/२०२१ रोजी जामीन असल्याने मदत करतो, असे म्हणून उर्वरित एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयात तक्रार दिली.
ठरल्या प्रमाणे शनिवारी ( दि.६ ) रोख रक्कम एक लाख रुपये स्वीकारताना पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम व कर्मचारी महेश दौंडकर यांना अटक केली. त्यांची पाच तास चौकशी करण्यात आली. आरोपींवर कामशेत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
—–