Thursday, April 17, 2025
Latest:
निवडणूकराष्ट्रीय

दिव्यांग व्यक्तींना मतदान करण्यासाठी ‘सक्षम’ ॲपच्या माध्यमातून सुविधा

पुणे, दि. २२ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने ४० टक्क्यांहून अधिक दिव्यांग असणाऱ्या व्यक्तींसाठी आणि ८५ वर्षे पूर्ण झालेल्या वयोवृद्धांना मतदान प्रक्रिया सुलभ होण्याच्या दृष्टिने सुरू केलेल्या ‘सक्षम’ ॲपच्या माध्यमातून अधिकच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.

या ‘सक्षम’ ॲपवर दिव्यांग मतदारांसाठी दिव्यांग म्हणून नोंदणी करण्याची, नवीन मतदार नोंदणीसाठी, मत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित करणे, मतदान केंद्र बदलाची व व्हील चेअरची विनंती करता येत असून मतदार यादीत नाव शोधण्याची, मतदान केंद्र जाणून घेणे, तक्रारी नोंदविणे, मतदान अधिकारी शोधणे, बूथ लोकेटर स्थिती तपासणे इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

सक्षम ॲपवर अंधत्व, अल्प दृष्टी, बहिरेपणा, कमी श्रवणशक्ती, शारीरिक व्यंग, मानसिक आजार (मानसिक सामाजिक अपंगत्व), कुष्ठरोग, बौद्धिक अपंगत्व, सेरेब्रल पाल्सी, बौनेत्व, मस्कुलर डिस्ट्रोफी, ॲसिड हल्ल्यातील बळी, भाषण आणि भाषेतील अपंगत्व, विशिष्ट शिकण्याची अक्षमता, ऑटिझम, स्पेक्ट्रम विकार, मल्टिपल स्क्लेरोसिस आणि पार्किन्सन रोगासह क्रॉनिक न्यूरोलॉजिकल विकार, हिमोफिलिया, थॅलेसेमिया आणि सिकल सेल ॲनिमियासह रक्त विकार आणि एकाधिक अपंगत्व असलेल्या व्यक्ती नोंदणी करू शकतात.

दिव्यांग व्यक्तींसाठी सर्व ठिकाणी मतदान केंद्र तळमजल्यावर असतील. तेथे पिण्याचे पाणी, प्रतिक्षा शेड, वैद्यकीय किट, सुलभ शौचालय, मतदान केंद्रांवर पुरेशी विद्युत रोषणाई, केंद्रांवर रॅम्प आणि व्हीलचेअरची सोय, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राधान्याने प्रवेश सुविधा, स्वतंत्र रांगेची सुविधा, मानक चिन्हे आणि साइन बोर्ड, मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर घेऊन येण्याची व घरी सोडण्याची मोफत वाहतूक सुविधा, मतदान केंद्रावर स्वयंसेवक सहाय्य उपलब्ध असणार आहे. अंध आणि अशक्त मतदारांच्या मतांची नोंद करण्यासाठी ईव्हीएम वर ब्रेल लिपीची व मतदनीसाची सुविधा उपलब्ध आहे.

वयोवृद्ध (८५ वर्षे वय पूर्ण झालेले) नागरिक आणि ४० टक्क्यांहून अधिक अपंगत्व आहे अशा व्यक्तींसाठी घरातून मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. वयोवृद्ध आणि दिव्यांगांनी मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावण्याची इच्छा व्यक्त केल्यास त्यांच्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. प्रतिकूल परिस्थितीतही मतदान केंद्रावर येऊन मतदान करणारे ज्येष्ठ मतदार नव्या पिढीसाठी प्रेरक असतात, ते खऱ्या अर्थाने समाजातील आदर्श असल्याने त्यांचा सन्मानही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!