महाबुलेटीन न्यूज : दिपज्योती फाऊंडेशनतर्फे तृतीयपंथी व विधवा महिलांकरिता हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन, ४०० महिलांचा सहभाग… या नाविन्यपुर्ण कार्यक्रमाचे सर्वांनी केले स्वागत
महाबुलेटीन न्यूज : दिपज्योती फाऊंडेशनतर्फे तृतीयपंथी व विधवा महिलांकरिता हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन, ४०० महिलांचा सहभाग…
या नाविन्यपुर्ण कार्यक्रमाचे सर्वांनी केले स्वागत, तृतीयपंथी व विधवा महिला गेल्या भारावून…
महिलांना स्किल डेव्हलपमेंटचे शिक्षण देणे ही काळाची गरज : माजी महापौर कमलताई व्यवहारे...
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे, दि.०८ : दिपज्योती फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजाच्या वंचित घटकातील तृतीयपंथी व विधवा महिलांना हळदी-कुंकू आणि इतर मनोरजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा सुमारे चारशे हून अधिक समाजातील दुर्लक्षित झालेल्या वंचित महिलांनी मनसोक्त आनंद घेतला.
या कार्यक्रमाचे आयोजन आण्णाभाऊ साठे कलादालन, पद्मावती येथे करण्यात आले होते. या प्रसंगी माजी महापौर कमलताई व्यवहारे, पोलिस निरिक्षक सविता ढमढेरे, नगरसेविका अश्विनी भागवत, सोनल दळवी, फाऊंडेशनच्या अध्यक्षा दिपाली घाडगे, वंदना पवार, निशा पाटील, अनिता जाधव, अंजली माने, रिमा पवार व वैशाली बगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना माजी महापौर कमलताई व्यवहारे म्हणाल्या, “आज महिला अनेक क्षेत्रात पुढे आहेत. मात्र, त्यांना स्किल डेव्हलपमेंटचे सुव्यवस्थित शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. तसेच, शासनाच्या सर्व योजनांची माहिती समाजातील शेवटातील शेवटच्या महिलेपर्यंत पोहचायला हवी. महिला आर्थिक सक्षम झाल्या तरच त्या ख-या अर्थाने त्या स्वंयपुर्ण होतील. महिलांनी आपआपली जबाबदारी संभाळत चांगले आरोग्य आणि संस्कृती जोपासली पाहिजे.”
तृतीयपंथींच्या प्रतिनिधी सोनल दळवी म्हणाल्या, “आम्ही लहानपणापासूनच स्वतःला एक महिला म्हणून समजत असतो. मात्र, समाजातून आमचा महिला म्हणून सन्मान केला जात नाही, ही आमच्यासाठी खरोखरच खेदाची गोष्ट आहे. आम्हाला ही देशाचा नागरिक म्हणून सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, तो सन्मान समाजाच्या सर्व स्तरातून आम्हाला मिळायला हवा. आमच्यासाठी काही विशेष कायदे केंद्र सरकारने करायला पाहिजे, अशी आमची मागणी आहे.”
फाऊंडेशनच्या अध्यक्षा दिपाली घाडगे म्हणाल्या, “आपला भारतीय समाज विविध जाती धर्मात विभागला आहे. मात्र, सर्व महिला या एकाच स्त्री या जातीच्या असून महिलांसाठी स्त्रीत्व हीच एकमेव सर्वश्रेष्ठ जात आहे. तेंव्हा, महिलांनी द्वेष, अहंकार न करता एकमेकींच्या हातात हात घालून समाज उन्नतीचे व प्रगतीचे काम करायला हवे. महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येऊन स्वतःचे जीवन घडविले पाहिजे, तरच देशाचा सर्वार्थाने सर्वांगिण विकास होईल.”
निशा पाटील म्हणाल्या, “सध्या जिकडे तिकडे हळदी-कुंकू कार्यक्रम मोठया प्रमाणात पार संपन्न होत आहेत. परंतु यामध्ये तृतीयपंथी आणि विधवा महिलांना आवर्जून डावलले जाते. त्यांनाही माणुस म्हणून जगण्याचा हक्क आहे. म्हणूनच दिपज्योतीने खास अशा महिलांसाठी हळदी-कुंकू या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.”
या प्रसंगी, हळदी-कुंकू समारंभ, महिलांचे मनोरंजनात्मक खेळ, बक्षिसाच्या विविध स्पर्धा व नृत्य आदी कार्यक्रमांचे धमाकेदार आयोजन केले होते. मनोरंजनाच्या विविध स्पर्धेत सहभाग घेतलेल्या महिलांना मानाची पैठणी, सोन्याची नथ आणि इतर विविध बक्षिसांचे वाटप करण्यात आले. लॅाकडाऊन नंतर अशा कार्यक्रमात पहिल्यांदाच महिला सहभागी होत असल्याने त्यांच्या चेह-यावर विशेष आनंद होता. दिपज्योती फाऊंडेशनच्या माध्यमातून महिलांकरिता सतत निरनिराळे उपक्रम राबविले जातात.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने झाली. सुत्रसंचालन जगदाळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक निशा पाटील यांनी केले. तर आभार अनिता जाधव यांनी व्यक्त केले.