देहुत बीज सोहळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास वारकरी संप्रदायाने सहकार्य करावे : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश ● आळंदीत वारकरी संप्रदायासमवेत बीज सोहळा बैठकीत आवाहन
● देहुमध्ये ५० मान्यवर वारकरी लोकांत बीज सोहळा करण्यास शासनाची परवानगी
● धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, प्रवचन, भजन, सप्ताह ५० ते १०० वारकरी भाविकांच्या उपस्थितीत सुरू करण्याची परवानगी मिळावी : भाविकांची मागणी
● वरिष्ठांशी संवाद साधून राज्य शासनाकडे ५० वारकऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय नियमांचे पालन करून परवानगी देण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेऊ : कृष्णप्रकाश यांची ग्वाही
महाबुलेटीन न्यूज
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : कोरोना सर्वत्र झपाट्याने वाढत असल्याने संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यास वारकरी संप्रदायातील पाईकांसह भाविकांनी देहुत गर्दी न करता, आपआपल्या भागात बीज सोहळा मोजक्याच वारक-यांत साजरा करून देहुत गर्दी करून आपल्यामुळे कोरोना वाढणार नाही याची दक्षता घेवून पोलिस व आरोग्य सेवा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केली.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी तीर्थक्षेत्र आळंदीतील वारकरी संप्रदायातील विविध वारकरी संस्थांचे पदाधिकारी, महाराज मंडळी व संप्रदायातील क्रियाशील मान्यवर यांचे समवेत कोरोना महामारीचे संकट काळात तीर्थक्षेत्र देहुत (दि.३०) बीज सोहळा होत आहे. या पार्श्वभुमीवर देहुत मोजक्याच वारकरी भाविकांत बीज सोहळा होण्यासह देहुत गर्दी होवू नये, म्हणून वारकरी व पोलिस प्रशासन यांचे समवेत सुसंवाद बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत ते मार्गदर्शन करताना बोलत होते.
या बैठकीस पोलिस सहआयुक्त रामनाथ पोकळे, उपआयुक्त मंचक इप्पर, आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, पोलिस हवालदार मच्छिंद्र शेंडे, ह.भ.प. बाळासाहेब महाराज शेवाळे, आत्माराम महाराज शास्त्री, पांडुरंग महाराज शितोळे, पंडित महाराज क्षीरसागर, कल्याण महाराज गायकवाड, भरत महाराज थोरात, नरहरी महाराज चौधरी, चोपदार राजाभाऊ रंधवे, भगवान साखरे, लक्ष्मण पाटील, संग्रामबापू भंडारे, नगरसेवक प्रकाश कु-हाडे, माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, शिवसेनेचे माजी खेड तालुका प्रमुख उत्तम गोगावले, अविनाश महाराज धनवे आदी प्रमुख महाराज उपस्थित होते.
देहुत फार गर्दी झाल्यास आरोग्य सेवा व पोलिस प्रशासन यांचेवर ताण येईल, कोरोना वाढेल. त्यामुळे सामाजिक आरोग्याचे दृष्टीने वारकरी संप्रदायाने देहुत गर्दी करू नये. आरोग्य सेवा व पोलिस प्रशासन तसेच शासनास सहकार्य करावे. बंडातात्या कराडकर यांनी वारकरी भाविकांना देहुत येण्याचे आवाहन केले आहे. हा निर्णय घेण्यासाठी वारकरी संप्रदायाची बैठक झाली नसून थेट निर्णय जाहीर करण्यात आल्याचे या बैठकीत समोर आले असल्याने वारकरी, महाराज मंडळी यांनीही बंडातात्या कराडकर यांना आंदोलन करण्यापासून परावृत्त करावे, तसेच सुरक्षिततेस साथ देण्याचे आवाहन कृष्ण प्रकाश यांनी केले.
यावेळी उपस्थित वारकरी महाराज मंडळी यांचेतील मान्यवरांनी संवाद साधत वारकरी संप्रदायावर धार्मिक कार्यक्रमांची बंधने शिथिल करून धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, प्रवचन, भजन, सप्ताह ५० ते १०० वारकरी भाविकांच्या उपस्थितीत सुरू करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी केली.
यावर आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वरिष्ठांचे समवेत संवाद साधून राज्य शासनाकडे ५० वारकरी यांचे उपस्थितीत शासकीय नियमांचे पालन करून परवानगी देण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली. शासनाचे लोकप्रतींनिधी समवेत बैठक सुरू असताना संवाद साधल्याचे सांगत वारकरी संप्रदायाने गर्दी टाळून बीज सोहळा होण्यास सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले. वारकरी संप्रदायाचे भावना जाणून घेत शासन स्तरावर पोहचविण्याचे काम केले जाईल मात्र संत वचने, ज्ञानेश्वरीतील पसायदान यांच्यातील मागणे यांची आठवण करून देत कोरोना रोखण्यासाठी देहुत गर्दी न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सहपोलिस आयुक्त रामनाथ पोकळे म्हणाले, देहु देवस्थान मध्ये ५० मान्यवर वारकरी लोकांत बीज सोहळा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. गेले वर्षभर सर्व सण, उत्सव, वारी देखील मोजक्या लोकांत साजरी करण्यात आली आहे. महाराष्टात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शासनाची भुमिका लोकांना मदत करण्याची आहे. शासनाच्या नियमांचे पालन काळजी घेऊन करणे गरजेचे आहे. सर्वांवर बंधने आहेत. सर्वांचे सुरक्षिततेसाठी हे नियोजन असून कोणीही सुरक्षिततेच्या बाबतीत आडमुठी भुमिका घेऊ नये, तसेच सर्वांनी शासनाचे नियम पाळावे. सोशल मिडीयावर अथवा इतर ठिकाणी वेगळे वर्तन घडु नये. कायदा सुव्यवस्था कायम राहण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
संवाद साधताना उपस्थित मान्यवरांनी यावेळी सांप्रदायाचे परंपरा कायम सुरू रहाव्यात, कीर्तन, प्रवचन आदी सेवा सुरू रहाव्यात अशी मागणी केली. शासनाने इतर कार्यक्रम सुरु केले मात्र कार्तन, धार्मिक सप्ताह बंद ठेवले आहेत. सप्ताह सुरु व्हावेत, अशी मागणी बैठकीत जोरदार पणे करण्यात आली.
मोठ्या प्रमाणात लोक सोहळ्यात जमा होणे, याचा कोरोनाचे काळात गांभीर्यपुर्वक विचार करणे गरजेचे असल्याचे पंडित कल्याण महाराज गायकवाड यांनी सांगितले. लग्न समारंभाप्रमाणे गावागावांत धार्मिक कार्यक्रम करण्यास नियमांचे पालन करुन परवानगी देण्यात यावी.
किर्तनांना परवानगी मिळावी, वेळ प्रसंगी किर्तनकारांची कोविड टेस्ट करावी. विचारांती निर्णय घेण्याचे आवाहन करण्यात आले. कोरोना कमी होणे गरजे असून त्याच प्रमाणे गावागावांत मोजक्याच लोकांत सप्ताह सुरू होणेही महत्त्वाचे आहे. मात्र आम्हीही गर्दीचे विरोधात असल्याचे संग्रामबापू भंडारे यांनी सांगितले.
बाळासाहेब महाराज शेवाळे यांनी कोरोनाचे काळात आपणावर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी केलेले प्रयत्न सांगून वारकरी संप्रदायातील धार्मिक कार्यक्रम सुरू व्हावेत, मात्र गर्दीवर देखील नियंत्रण असावे, यासाठी इतर लोकांची गर्दी कमी करण्याची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी नरहरी महाराज चौधरी, नगरसेवक प्रकाश कु-हाडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डी. डी. भोसले पाटील यांनीही पोलिस प्रशासनाचे भूमिकेचे स्वागत केले. संग्रामबापू भंडारे यांनी सूत्रसंचालन केले. वरिष्ठ पोलिस निरीशक ज्ञानेश्वर साबळे यांनी प्रास्ताविक केले. धनवे महाराज यांनी आभार मानले. पसायदान गायनाने पोलिस व वारकरी संप्रदायातील मान्यवरांच्या संवाद बैठकीची सांगता झाली.
वारकरी व प्रशासन यांचेत नेहमी सुसंवाद रहावा, सर्व संप्रदायाच्या धार्मिक सेवा परंपरेने कायम रहाव्यात, असे आळंदीतील माऊलींचे सेवक राजाभाऊ रंधवे चोपदार यांनी सांगितले.
राज्यात लग्नसमारंभांत पन्नास लोकांना परवानगी आहे. त्याप्रमाणे वारकरी सांप्रदायातील कार्यक्रम झाले पाहिजेत. दक्षता घेऊन मार्ग काढावा, असे नरहरी महाराज चौधरी यांनी सांगितले.
बाळासाहेब शेवाळे महाराज म्हणाले, राज्यात कोरोनाने अनेकांचे बळी गेले. नियमांचे पालन करुन देहु वारी व्हावी, परंपरांचे पालन करताना वारीत महाराज लोक कमी, तर इतर लोक खुप होते. आळंदी यात्रा काळात हे उघड झाले आहे. पायी वारी करणारे वारकरी यांचाही विचार व्हावा.
वारकरी सेवा फाऊंडेशनचे वतीने प्रमुख नात्याने पांडुरंग महाराज शितोळे म्हणाले, वारकरी लोकांच्या भावना कळण्यास आपण संदेश फिरवल्याचे जाहीर केले. वारकरी सेवा फाउंडेशन तर्फे भावना व्यक्त करताना गावागावांत मर्यादीत लोकांमध्ये वारीसह कीर्तन, प्रवचनाचे कार्यक्रम सुरू व्हावेत, यास राज्य शासनाने बीज वारी पासून परवानगी द्यावी, असे आवाहन केले. राज्यात धार्मिक कार्यक्रमांना बीज उत्सवासह ५० ते १०० लोकांना परवानगी देण्याची मागणी केली.
यावेळी अनेक महाराजांनी सूचना केल्या. यात सर्व प्रकारच्या नियमांचे पालन करुन बीज सोहळा वारी व्हावी. सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे. राज्यातील महाराजांच्याही काही अडचणी आहेत. अनेक धार्मिक सेवाभावी कार्यरत असणाऱ्या संस्था बंद पडल्या आहेत. वारक-यांच्या भावना देखील शासनाने समजुन घेणे आवश्यक असल्याच्या सुचना आल्या.
—