दहा तारखेपर्यंत ‘देव पाण्यात’….! ‘त्या’अधिकाऱ्यांचे जीव टांगणीला.
महाबुलेटिन नेटवर्क : शिवाजी आतकरी
सरकारचे ठरले होते ३१जुलै पर्यंत २०/२१ या आर्थिक वर्षातील बदल्या करायच्या. तसा शासन निर्णय झाला होता. कोविड 19 या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर २०२०/२१ आर्थिक वर्षातील बदल्या ३१जुलैपर्यंत करण्यात येणार होत्या. प्रामुख्याने महसूल, पोलीस तसेच इतर विभागातील अधिकाऱ्यांनी ‘सोयी’च्या ठिकाणी जाण्यासाठी लॉबिंग केले होते. बदल्यांमधील ‘अर्थ’ लक्षात घेता संबंधीत अधिकारीही तयारीला लागले होते. आता मात्र त्या सर्वांना १० ऑगस्ट पर्यंत बदल्यांसाठी वाट पाहायला लागू शकते.
महाराष्ट्र राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या बदल्यांसंदर्भात सुधारित पत्रकानुसार ३१ जुलैपर्यंत करण्यात येणाऱ्या बदल्यांसाठी १०ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तशा सूचना पत्रकात नमूद करण्यात आल्या आहेत. ७ जुलैच्या शासन आदेशानुसार या बदल्या ३१ जुलैपर्यंत करण्यात येणार होत्या. आता मात्र दहा ऑगस्ट पर्यंत या बदल्याना शासन निर्णयानुसार मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे तोपर्यंत संबंधीत अधिकाऱ्यांना देव पाण्यात ठेवण्यावाचून पर्याय राहिलेला नाही. बदल्या आणि सोयीचे ठिकाण यांमुळे त्या सर्व अधिकाऱ्यांचे जीव टांगणीला लागल्याचे म्हणावे लागेल.