कोविड योद्धे : थोडं कौतुक त्यांचंही करू !
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
कोरोनाने प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक प्रसंग आणले…, काही मन हेलावून टाकणारे…, काही धीर देणारे…, काही गर्भगळीत करणारे…., प्रत्येकाचे अनुभव आणि प्रसंग आपल्या पातळीवर वेगवेगळे….
खरतरं जीवन जगताना आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात की त्यातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. काही प्रसंगांमधून आपल्याला अनेक व्यक्ती अशाही भेटतात की ते त्यांचं काम म्हणजे फक्त एक कर्तव्य म्हणून करतात. पण ते करत असताना त्यांच्या मनात त्या कामाविषयी प्रचंड निष्ठा आणि प्रामाणिकपणा पाहायला मिळतो. विशेष म्हणजे ते त्यांचं काम अगदी निमूटपणे करत असतात. कसलाही गाजावाजा नाही, चेहऱ्यावर कोणताही अविर्भाव नाही की चेऱ्यावर कुठला त्रास नाही तक्रार नाही, सगळं काम जबाबदारीने पार पाडत असतात.
शिक्षक तर राष्ट्रीय कर्तव्य म्हणून कोणतेही काम आनंदाने स्वीकारत असतात. आपल्या कामाचं कौतूक म्हणून कोणी आपल्या पाठीवर कोणी कौतुकाची थाप मारावी, असा साधा विचारही कधी त्यांच्या मनात येत नाही, ते भले आणि त्यांचं काम भलं !
सध्या कोरोनाचा प्रसंग अत्यंत बाका आहे.आज प्रत्येकजण कितीही नाही म्हटलं तरी तणावाखाली वावरतोय. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी खऱ्या अर्थाने कोण लढत असेल तर ते म्हणजे कोविड सेंटर मध्ये काम करणारे डॉक्टर्स, आरोग्य सेवक, सफाई कर्मचारी तसेच गावोगावी सहा महिन्यांपासून उन्हातान्हात आपल्या आरोग्याची पर्वा न करता कोरोनाचे सर्वेक्षण करणारे शिक्षक, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील पदाधिकारी आणि स्वयंसेवक हे खरे आजचे देवदूत आहेत हे नक्की.
माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर पुढील उपचारांसाठी मी लेण्याद्री येथील कोविड सेंटर मध्ये ऍडमिट झालो. कोविड सेंटरच्या स्वागत कक्षावर उपस्थित असलेल्या आरोग्य सेवकांनी नाव नोंदणी केली. ऑक्सिजन पातळी आणि ताप चेक केला आणि काही औषधं देऊन रूममध्ये जायला सांगितलं.
या कोविडसेंटर मध्ये येण्यापूर्वी या सेंटर बद्दल जे काही कानावर आलं होतं ते आणि मी येथे येऊन प्रत्यक्ष अनुभवलेली परिस्थिती यात खूपच विरोधाभास जाणवला. येथे स्वच्छता नसते, जेवण चांगलं मिळत नाही, येथे रुग्णांची व्यवस्था चांगली नाही, कोणीही लक्ष दिलं जात नाही, अशा प्रकारचा जो काही नकारात्मक सूर कानावर आला होता तो पहिल्या दिवशीच खोटा ठरला.
कोरोनाच्या या संकट काळात माणूस माणसापासून लांब जात असतानाच हे कर्मचारी रुग्णांच्या अगदी जवळ जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून त्याची तपासणी करतात. आपल्या घरात, वस्तीत किंवा परिसरात एखादी कोरोना बाधीत व्यक्ती आढळली तर आपण व आपलं संपूर्ण कुटुंब हादरून जातो. एका मानसिक तणावाखाली आपण जगू लागतो. आपली ही अवस्था होते तर विचार करा त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची काय अवस्था होत असेल; की जे रोज कोरोना बाधीत रुग्णांसोबत मृत्यूला तळहातावर घेऊन काम करत आहेत.
कोरोना बाधीत रुग्णांमध्ये जाऊन काम करणं म्हणजे स्वतःच कोरोनाला आमंत्रण देण्यासारखं आहे, याची कल्पना असूनही हे कर्मचारी आपला जीव मुठीत धरून कोरोना बाधीत रुग्णांची माणुसकी खातर सेवा करत आहेत. लेण्याद्री कोविड सेंटर मध्ये सुमारे ५० कर्मचारी शिफ्ट प्रमाणे कार्यरत आहेत. दिवसभरात ३ ते ४ वेळा प्रत्येक रुग्णाजवळ जाऊन त्याची ऑक्सिजन पातळी, ताप आणि रक्तदाब तपासला जातो. याशिवाय अन्य काही त्रास होतोय का याचीही आवर्जून चौकशी केली जाते. या सेंटर मधील रुग्णांची सेवा करत करत या स्टाफ पैकी १२ जण कोरोनाबाधीत झाले आहेत, तर एक आरोग्य अधिकारी देखील कोरोना बाधीत झाले आहेत.
या कोविड सेंटर मध्ये सफाई कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता तर राखली जातच आहे, पण येथे येणाऱ्या रुग्णांनी देखील स्वच्छता राखण्याबाबत काळजी घेतली पाहिजे. स्वच्छता राखण्याबाबत रूग्णांची देखील मानसिकता सकारात्मक असणे गरजेचे आहे. आपण आपल्या घरी जसं राहतो तसंच जर का आपण कोविड सेंटर मध्ये उपचार घेताना राहिलो, तर आपल्याला कुठेच घाण किंवा अस्वच्छता दिसणार नाही. अगदी लहान लहान गोष्टी असतात की, चहाचा पेपर कप चहा पिऊन झाल्यानंतर डस्टबीनमध्ये टाकावा, जेवणातील भाजीत असणारा कढीपत्ता वॉश बेसिन मध्ये न टाकता तो डस्टबीन मध्येच टाकावा, म्हणजे वॉश बेसिन चॉकअप होणार नाही. टॉयलेट वापरल्यानंतर त्यात पाणी टाकणे, तंबाकू आणि गुटखा खाऊन कुठेही घाणेरड्या पिचकाऱ्या न मारणे, यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींचे जर आपण पालन केले, तर कोविड सेंटर हे एखाद्या हॉस्पिटल पेक्षा कमी वाटणार नाही! कोविड योध्ये लढत असताना आपण स्वयंशिस्त आणि स्वच्छता राखली तरी कोरोना आपण लवकर संपवू यात तिळमात्र शंका नाही…..!
✍🏼 © अशोक खरात ( पत्रकार )