कोविड रुग्णालयाचा अकलूज पॅटर्न इंदापूरात राबवावा
कोविड रुग्णालयाचा अकलूज पॅटर्न इंदापूरात राबवावा,
इंदापूरकरांची अपेक्षा
महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे
इंदापूर : अकलूज पॅटर्न राबवून इंदापूर तालुक्यात देखील कोविड रुग्णालय उभा करावे, त्यासाठी राजकारण बाजूला ठेवून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी एकत्र यावे अशी अपेक्षा इंदापूरातील सामान्य लोकांमधून व्यक्त होवू लागली आहे. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांनी स्वनिधीतून शंभर खाटांची सोय असणारे ‘अकलूज कोविड रुग्णालय’ उभारले. इंदापूरचे आमदार,राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले.
“अकलूज कोविड रुग्णालय हे संपूर्ण राज्यासाठी आदर्शवत व पथदर्शी असल्या”चे मत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. मोहिते पाटील यांनी आवाहन केले.त्याला प्रतिसाद म्हणून हे वैद्यकीय व्यवसायिक एकत्र आले. त्यातून कोविड रुग्णालयाची उभारणी झाली. अशीच प्रेरणा इंदापूर तालुक्यातील नेत्यांकडून वैद्यकीय व्यवसायिकांना मिळू शकत नाही का की,नेतेमंडळी केवळ इतरांनी केलेल्या कामांची उद्घाटने करण्यापूरती किंवा एकमेकांना दुषणे देण्यासाठीच कार्यरत आहेत का,असे प्रश्न लोकांमधून उपस्थित होत आहेत.
इंदापूरपासून अकलूज हे केवळ पंचवीस किलोमीटरवर आहे. इंदापूर तालुक्यातील वकीलवस्ती,बावडा,सराटी भागातील लोकांची अकलूज ही हक्काची बाजारपेठ आहे. अकलुज भागातील साखर कारखान्यांमध्ये संचालक म्हणून या भागातील लोक काम करतात, असे असताना अकलूज मध्ये जे विधायक काम घडते,ते इंदापूर तालुक्यात का होत नाही,असा सामान्यांचा सवाल आहे.
सन १९९५ पासून अठरा ते वीस वर्षे हर्षवर्धन पाटील यांनी तालुक्याचे आमदार म्हणून काम करताना येणा-या प्रत्येक सरकारमध्ये मंत्रीपद भुषवले. त्यांचे सर्वच पक्षातील नेते कार्यकर्त्यांशी चांगले संबंध आहेत. त्या नंतर आलेले,सलग दोन वेळा आमदार व आत्ता राज्यमंत्री झालेले दत्तात्रय भरणे हे शरद पवार व अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. यंदाच्या विधानसभा निवडणूकीत दीड ते दोन हजार मतांच्या अंतराने या दोघांची हारजीत झालेली आहे. म्हणजेच तालुक्यातील निम्मी निम्मी मते त्या दोघांच्या वाट्याला आली आहेत. त्यामुळेच या दोघांवर मतदारांचा हक्क आहे. त्याच्या अनुषंगाने मतदारांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ही या दोघांचीच आहे.
दिवसेंदिवस तालुक्यातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होते आहे. श्रेय घेण्याच्या हमरीतुमरीत उद्घाटने पार पडलेल्या भिगवण कोविड केअर सेंटरमध्ये अद्याप उपचाराची सोय झालेली नाही. निमगाव केतकी येथील कोविड सेंटर मध्ये सामग्री आली पण ती हाताळणारे तज्ज्ञ नाहीत. त्यामुळे स्वॅबचे नमुने देण्यासाठी लोकांना इंदापूरमधील विलगीकरण कक्षाकडेच धाव घ्यावी लागते. लोकांची संख्या जास्त व साधने कमी त्यामुळे कमी अधिक प्रमाणात इंदापूरच्या विलगीकरण कक्षात लोकांची गैरसोय होत आहे, ही वस्तुस्थिती आहे.
सतत कोण निगेटीव्ह कोण पाॅझिटिव्ह हे पहाण्यात व कधी कोण मरेल याच्या धास्तीमध्ये तमाम इंदापूरकर आहेत. लोक सुरक्षित रहावेत या करिता आपल्या इमारती कोविड उपचारासाठी देण्याची ही समाजसेवकांची तयारी आहे. काही ही होवू देत पण कोरोनावर नियंत्रण येवू देत म्हणून लोकांची कोविड रुग्णालयासाठी तन मन धनाने सहकार्य करण्याची इच्छा आहे.
अश्या बाक्या प्रसंगाच्या वेळी विद्यमान आमदारांनी आपल्या पवार कुटुंबियांच्या जवळकीचा फायदा लोकांसाठी करुन द्यावा. माजी आमदारांनी राज्यातील सर्व पक्षीय नेत्यांशी असलेल्या आपल्या सुसंस्कृत संबंधांचा उपयोग सामान्यासाठी करावा. प्रसंगी दिल्लीश्वरांसमोर आपले वजन खर्ची टाकावे. त्याचबरोबर राजकीय कलह बाजुला ठेवून कोरोना नियंत्रणासाठी एकत्र यावे. अकलूज पॅटर्न इंदापूर तालुक्यात राबवावा अशी अपेक्षा लोकांमधून व्यक्त होत आहे.
——