Saturday, August 30, 2025
Latest:
कोरोनाजुन्नरपुणे जिल्हामहाराष्ट्रविशेषसण-उत्सव

कोरोनाच्या संकटाने ८०० वर्षांची परंपरा प्रथमच खंडीत

 

जुन्नर ते तुळजापूर तुळजाभवानी मातेच्या पलंगाची १२ व्या शतकापासूनची परंपरा प्रथमच खंडीत

महाबुलेटीन न्यूज / आनंद कांबळे
जुन्नर : तुळजाभवानी मातेच्या जयघोषात भाविक भक्तांच्या डोक्यांवर तर कधी हातावर उचलत पायी प्रवासाची १२ व्या शतकापासूनची परंपरा असलेल्या तुळजापूरच्या भवानी मातेच्या पलंग सोहळा कोरोनाच्या संकटामुळे मागील ८०० वर्षात प्रथमच खंडीत होणार आहे.

एवढ्या प्रदीर्घ काळाचा पलंगाचा हा प्रवास अनेक संकटे झेलत अव्ह्यातपणे सुरू राहिल्याचे पुर्वज सांगतात, तर यंदा मात्र कोरोनाच्या संकटाने पलंगाच्या अखंडीत चाललेल्या परंपरेला बाधा पोहचली आहे. जुन्नरहुन तुळजापूरकडे प्रस्थान झाले. पलंगाचे भाद्रपद पंचमीला जुन्नर येथे घोडेगाव येथून आगमन होते. जुन्नर येथील दहा दिवसाचे मुक्कामानंतर देवीचा पलंग पायी प्रवासाने तुळजापूरला रवाना होतो.

पलंग निर्मितीची प्रक्रिया घोडेगाव ( ता आंबेगाव ) येथुन सुरू होते. पुर्वी घोडेगाव येथे वास्तव्यास असणारे लाकडावर कोरीव काम करणारे ठाकुर कुटुंबिय पूर्वापार पणे पलंग तयार करत. कातीव काम व देवीच्या हिरव्या बांगड्या व भंडाऱ्याचे प्रतीक म्हणून हिरव्या व पिवळ्या नैसर्गिक रंगाच्या लेपणातून चार पाय, छत व सहा कळस अशा रचनेत पलंग बनविला जातो. सध्या हे कुटुंब पुणे येथे रहावयास असल्याने पलंगाचे कातीव सुटे भाग घोडेगाव येथे पाठविले जातात. त्यानंतर घोडेगाव येथील भागवत कुटुंबाकडे पलंग जोडण्याचा मान आहे. घोडेगाव येथील तेली समाजाकडे पलंगाची जबाबदारी असते.

जुन्नर येथे तेली समाजाच्या सभागृहात पलंगावर तुळजाभवानी देवीची गादीची स्थापना करण्यात येते. घोडेगाव ते तुळजापूर या पायी प्रवास मार्गात फक्त जुन्नर येथे १० दिवस पलंगाचा मुक्काम जुन्नर येथे असतो. राजमाता जिजाऊ पलंगाच्या दर्शनासाठी येत असल्याचे इतिहासात संदर्भ मिळतात. पलंग तुळजापूरला नेण्याचे मानकरी अहमदनगर ( नालेगाव ) येथील पलंगे कुटुंबियांकडे आहे.

जुन्नर, नारायणगाव, आळेफाटा, पारनेर, नगर, भिंगार, जामखेड, आष्टी, भूम, चिलवडी, आपसिंगामार्गे दस-याच्या आदल्यादिवशी तुळजापुरापर्यंत पलंगांचा प्रवास होतो. तुळजापूर येथे पलंगांचे स्वागतासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी येण्याची प्रथा आहे. तुळजापूर येथे नवरात्र महोत्सवाचे सांगता प्रसंगी दसऱ्याला देवीची मुर्ती सीमोल्लंघनाला नेली जाते व परत आले नंतर मुर्ती कोजागिरी पौर्णिमेपर्यंत जुन्या पलंगावर निद्रिस्त ठेवली जाते. पौर्णिमेच्या दिवशी जुना पलंग होमात टाकला जातो व जुन्नर वरून गेलेल्या नवीन पलंग मंदिरात ठेवला जातो.

अहमदनगर-कोरोनाच्या संकटाने प्रथमच पलंगाची प्रस्थानची परंपरा नेहमीच्या वेळेत होणार नसली, तरी अद्याप दसऱ्याला अवकाश आहे. पुर्वापार नियोजन जरी होणार नसले तरी नवरात्र महोत्सवापर्यंत जर कोरोनाचे संकट आटोक्यात आले, तर तुळजाभवानी मंदीर व्यस्थापन व शासकीय यंत्रणा यांच्या समवेत लवकरच बैठक होऊन पलंग सोहळ्याचे नियोजन करण्यात येईल. परंपरा खंडीत होणार नाही अशी भाविकांना अपेक्षा आहे.
— गणेश पलंगे, पलंगाचे मानकरी

पलंगाचा संग्रहीत फोटो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!