कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चाकण एमआयडीसी मधील कारखाने काही दिवस बंद करा : शरद बुट्टे पाटील
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चाकण एमआयडीसी मधील कारखाने काही दिवस बंद करा : शरद बुट्टे पाटील
महाबुलेटीन न्यूज : हनुमंत देवकर
चाकण एमआयडीसी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी चाकण एमआयडीसी मधील कारखाने काही दिवस बंद करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचेकडे केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात बुट्टे पाटील यांनी म्हटले आहे की, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या चाकण परिसरातील एमआयडीसी कार्यक्षेत्रातील सर्व कारखाने सुरु आहेत. त्यामुळे आपण कितीही कडक निर्बंध लावले असले तरी या क्षेत्रात कुठलेही निर्बंध कारखाने पाळत नाहीत. गतवर्षीच्या लॉकडाऊनमध्ये कारखाने बंद केले होते, म्हणून संसर्ग आटोक्यात आला होता.
या कारखान्यांमध्ये मोठया प्रमाणावर कामागारांना कोव्हिड संसर्ग झालेला असुन तेच कामगार गावामध्ये येवून संसर्ग वाढवत आहेत. त्यामुळे गावकरी गावात असुनही त्यांना प्रचंड धोका वाढला आहे.
माझे मतदार संघातील आंबेठाण, वराळे, शिंदे, वासुली, सावरदरी, भांबोली या गावांमध्ये कामगारामुळे संसर्ग वाढला असुन लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे. हा संसर्ग थांबविण्यासाठी कोणत्याही उपाययोजना कारखाने करत नाहीत.
या कारखान्यांनी कामगारांची राहण्याची स्वतंत्र व्यवस्था करणे गरजेचे असताना तसे केलेले नाही. कामगार कामावरून गावात येतात आणि त्याचे कुटूंबाकडून गावात संसर्ग वाढत आहे.
कामगार हा देखील महत्वाचा घटक आहे. त्यांचे जीवावर कारखाने चालतात मग त्यांचे आरोग्याचे दृष्टीने कारखान्यांनी उपाययोजना करायला नको का? आपण यामध्ये तातडीने लक्ष घालावे, अन्यथा पुढच्या काही दिवसात एमआयडीसी कार्यक्षेत्रातील गावांमधला कोव्हीड संसर्ग आपल्या हाताबाहेर जावु शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.
—————-–—