Friday, April 18, 2025
Latest:
कोरोनापुणे शहर विभागविशेष

कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधून तपासणी करण्यावर भर द्या : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

महाबुलेटीन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी
पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी रुग्णालयांच्या यंत्रणेने कोरोना बाधित रुग्णांशी संपर्कात आलेल्या अधिकाधिक व्यक्तींना शोधून त्यांची तपासणी करण्यावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केल्या.
पुणे, देहू आणि खडकी कटक मंडळाच्या ( कॅन्टोनमेन्ट ) वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबर कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, पुणे कटक मंडळाचे ( कॅन्टोनमेन्ट ) मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार सिंग हे  उपस्थित होते.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, “कोरोनाचे रुग्ण मोठया प्रमाणत वाढत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कोरोना बाधित रुग्णांशी संपर्कात आलेल्या व्यक्ती शोधून त्यांची तपासणी करण्यावर भर द्यावा.  कोविड केअर सेंटर, संस्थात्मक विलगीकरण सुविधा वाढवाव्यात. रुग्णावर उपचार करतांना दर आकारणी शासकीय नियमानुसार करावी. रुग्णाला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून द्यावा. रुग्णाला वैद्यकीय सुविधा वेळोवेळी पुरविण्यात याव्यात. कोरोना रुग्णांबाबचा अहवाल अद्ययावत करुन वेळोवेळी जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात यावा. क्वॉरन्टाईन केलेल्यांना क्वॉरन्टाईनचा शिक्का मारण्यात यावा. तसेच रुग्णालयांना मनुष्यबळ व इतर अडचणी असल्यास त्याबाबतची माहिती ताबडतोब जिल्हा प्रशासनाकडे सादर करावी. माहिती सुसंगत असावी. प्रशासन सर्वेतोपरी सहकार्य करेल, असेही जिल्हाधिकारी राम म्हणाले. यावेळी पुणे, देहू आणि खडकी  कटक मंडळाचे ( कॅन्टोनमेन्ट ) वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!