कोरोनाग्रस्त रुग्णांवर विनामोबदला औषधोपचार करून एक वेगळा ठसा उमटवणारे पुणे जिल्ह्यातील रुग्णालय… ● पाचशेहून अधिक गोरगरिबांना औषधोपचाराने दिले जीवदान ! ● विनाशुल्क सेवा करून पुणे जिल्ह्यात निर्माण केला आदर्श… ● २५ वर्षांपासून रुग्णसेवेचा वसा…
कोरोनाग्रस्त रुग्णांवर विनामोबदला औषधोपचार करून एक वेगळा ठसा उमटवणारे पुणे जिल्ह्यातील रुग्णालय…
● पाचशेहून अधिक गोरगरिबांना औषधोपचाराने दिले जीवदान !
● विनाशुल्क सेवा करून पुणे जिल्ह्यात निर्माण केला आदर्श…
● २५ वर्षांपासून रुग्णसेवेचा वसा…
महाबुलेटीन न्यूज
उरुळी कांचन : कोरोना महामारीचा उपयोग वैद्यकीय क्षेत्रातील अनेक जण आज पैसे कमावण्याची संधी म्हणून करीत असताना श्री प्रयागधाम ट्रस्ट संचलित प्रयागधाम चॅरिटेबल रुग्णालयाने मात्र उरुळी कांचन परिसरात कोरोनावर विनामोबदला औषधोपचार करून एक वेगळा ठसा उमटवला आहे. गेल्या २५ वर्षांपासून घेतलेला रुग्ण सेवेचा वसा कोरोना काळातही जपत सुमारे पाचशेहून अधिक गोरगरिबांना औषधोपचाराने जीवदान दिले आहे.
उरुळी कांचन नजिक असलेल्या श्री प्रयागधाम ट्रस्टच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या प्रयागधाम चॅरिटेबल रुग्णालयाच्या माध्यमातून कोरोना संसर्ग साथीच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये परिसरातील सर्वसामान्य नागरिकांची अतिशय जबाबदारीने व विनाशुल्क सेवा करून पुणे जिल्ह्यात एक आदर्श निर्माण केला आहे.
पुण्यापासून २५ किलोमीटर व उरुळी कांचन पासून सुमारे ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या या ग्रामीण भागातील सर्व सामान्य जनतेसाठी मोफत असलेल्या रुग्णालयात जवळपास दोनशे बेडची क्षमता असून या ठिकाणी दररोज सुमारे पाचशे ते सहाशे रुग्ण या रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) विविध आजारांवरील उपचार करून घेण्यासाठी येत असतात. यामध्ये जनरल सर्जरी, फ्रॅक्चर, सांधेदुखी, डोळे, कान, नाक, घसा आणि स्त्रीरोग या संदर्भातील रुग्ण आपल्या आजारावर येथील तज्ञ डॉक्टरांच्या कडून उपचार करून घेण्यासाठी येत असतात व विनाशुल्क उत्तम दर्जाचे उपचार करून घेऊन आनंदाने आपल्या घरी जात असतात.
मात्र गेल्या वर्षी मार्चमध्ये सुरू झालेल्या कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाला ध्यानात घेऊन या रुग्णालयाने कोरोना उपचार केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेऊन या ठिकाणच्या सर्वसाधारण आजारावरील उपचारांना थोडा फाटा देत फक्त कोरोना वरील उपचारांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेऊन, कोरोना उपचार केंद्र या रुग्णालयात चालू करण्यात आले, मागील वर्षीच्या महामारीच्या काळात जवळपास पाचशेच्या पुढे रुग्णांना रुग्णालयातून कोरोनावर योग्य उपचार करून घरी पाठवण्यात आले. यावर्षीही १६ मार्च २०२१ नंतर सर्वसाधारण रुग्णालयाची उपचार पद्धती थांबवून कोरोना उपचार केंद्र म्हणून या रुग्णालयाचे रूपांतर करुन याठिकाणी कोरोनावरील उपचार सुरू करण्यात आले. या रुग्णालयात ४५ ऑक्सिजन बेड उपलब्ध असून आज मितीला ६५ कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत असून त्यापैकी ४५ रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. हे सर्व उपचार या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता अव्याहतपणे चालू असून श्री प्रयागधाम ट्रस्ट या रुग्णांच्या जेवणाची, नाश्त्याची, औषधाची सोय स्वखर्चाने करीत आहे. यासाठी शासनाकडून कोणत्याही मदतीची अपेक्षा न ठेवता हे काम “रुग्ण सेवा, हीच ईश्वर सेवा” या तत्त्वाने हा ट्रस्ट करीत आहे.
विशेष म्हणजे या ट्रस्टचे प्रमुख महात्मा आत्मप्रेमानंद यांना याबाबत माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की, “आम्ही ही सेवा करीत असताना कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा ठेवत नाही. आम्ही गेल्या सुमारे पंचवीस वर्षापासून विना मोबदला गोरगरीब जनतेची सेवा करीत आहोत त्याची कोठेही प्रसिद्धी करण्याची मानसिकता आम्ही जपलेली नाही. आजही आम्ही विनामोबदला कोरोना उपचार केंद्र चालवत असताना शासन दरबारी आमची एकच मागणी राहील की, आम्ही ज्या पद्धतीने कोरोना महामारीच्या काळात ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला विनामोबदला उपचार देऊन मदत करण्याचा प्रयत्न करीत आहोत ते करताना शासनाकडून ज्या गोष्टींची पूर्तता (सशुल्क) वेळेवर होणे गरजेचे आहे, त्या गोष्टी प्राधान्याने आमच्या रुग्णालयाला मिळाव्यात. जेणेकरून आम्ही या ठिकाणी भरती असलेल्या रुग्णांना वेळेवर उपचार देऊ शकू… व लवकर बरे करु शकू.”
०००००