Friday, April 18, 2025
Latest:
कोरोनाजुन्नरनागरी समस्यापुणे जिल्हाराजकीयविशेष

कोरोना हटाव मोहिमेला ‘राजकीय ग्रहण’ ● जुन्नरच्या नेत्यांनी इतरांचा आदर्श घेण्याची गरज

कोरोना हटाव मोहिमेला ‘राजकीय ग्रहण’
● जुन्नरच्या नेत्यांनी इतरांचा आदर्श घेण्याची गरज

महाबुलेटीन न्यूज । वसंत शिंदे 
नारायणगाव ( दि. ३१ मे ) : जुन्नर तालुक्यामध्ये सध्या कोरोनाने चांगलेच थैमान घातले आहे. लॉकडाऊनमुळे तालुक्यातील नारायणगाव, जुन्नर, ओतूर, आळेफाटा, बेल्हे या सर्वाधिक उलाढाल करणाऱ्या बाजारपेठा बंद असून या महामारीमुळे सामान्य जनतेचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. यामध्ये शेतकऱ्यांबरोबर सुतार, लोहार, पेंटर, वायरमेन, प्लंबर, गवंडी, सलून, हॉटेल, कटलरी हे व्यवसायिक व याला समांतर असणाऱ्या अनेक व्यवसाय बंद असल्यामुळे यांच्यावर आर्थिक कुऱ्हाड कोसळली आहे. मात्र कोरोनामधे फ्रन्टलाइन वर्कर जीव तोडून काम करत असताना राजकारणी मंडळींनी सुद्धा हातात हात घालून खरेतर या लढ्याला साथ देण्याची गरज आहे, अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे. केंद्र-राज्य आणि तालुका पातळीवर सुद्धा या महामारीत राजकारण होत असल्यामुळे जनता वैतागली आहे.

जुन्नर तालुक्यामध्ये आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे तालुक्यातील जनतेशी संवाद साधत आहे. सध्या पाणीप्रश्‍नासाठी आमदार अतुल बेनके यांनी जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागाचा दौरा केला. तालुक्यातील मुथाळणे, कोपरे, ओतुर, मांडवे या ठिकाणच्या लोकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. जुन्नर तालुक्यामध्ये आरोग्य समस्या बरोबर इतर समस्या सुद्धा महत्त्वाच्या आहेत. यामध्ये आदिवासी दुर्गम भागात रस्त्यांची सुद्धा दुरावस्था मोठ्या प्रमाणात झाली आहे. यासाठी रुग्णांना झोळीत घालून दवाखान्यापर्यंत जावे लागत आहे. याचबरोबर जुन्नर तालुक्यातील धरणातील पाणीवाटपाचा प्रश्न सुद्धा अत्यंत महत्त्वाचा झाला आहे. याला थेट न्यायालयीन लढ्याचं महत्त्व देऊन भविष्यातील संघर्षाची नांदी ठरू शकतो. यामुळे आ. बेनके यांनी आमदार होण्यापूर्वी या पाणीप्रश्‍नासाठी तालुका पिंजून काढला होता. त्यामुळे तो प्रश्न त्यांच्यापुढे आव्हान निश्चितच निर्माण करणार आहे.

तालुक्यातील महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुका कोरोना रुग्णांच्या बाबतीत हॉटस्पॉट झाला होता. रुग्णांची संख्या वाढता मृत्यूदर यामुळे प्रशासनापुढे आव्हान निर्माण झाले आहे. मंचर या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय, आरटीओ कार्यालय, एसटी डेपो, अभियांत्रिकी विद्यालय, प्रांत कार्यालय ही कार्यालये तसेच लवकरच या ठिकाणी सुसज्ज २८८ बेडचे जम्बो कोविंड सेंटर होत असल्यामुळे हे सर्व आंबेगाव तालुक्यात का मिळत आहे, यामध्ये जुन्नर तालुक्याचा विचार का होत नाही? याची पण चर्चा सध्या जुन्नर तालुक्यात होत आहे. यापूर्वी माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचा प्रशासनावर एक प्रकारचा वचक होता. या पद्धतीने महसूल, आरोग्य, पोलीस प्रशासन यावर कोणताही वचक सध्या दिसून येत नाही. प्रशासन सुद्धा कोरोनाच्या नावाखाली जनतेला वेठीस धरत असल्याचं चित्र आहे. असे जरी असले तरी एकंदरीत नवखे आमदार असले तरी बेनके तालुक्यातील लोकांच्या कोरोनाच्या समस्ये बरोबरच इतर नागरी समस्यांसाठी जुन्नर तालुक्यात फिरत आहेत ही त्यांची एकमेव जमेची बाजू आहे. यामधील  काही समस्यांचे निराकरण करण्यात ते यशस्वी झाले आहेत, मात्र त्यांनी निवडणुकीपूर्वी जी आश्वासने दिली आहेत त्याची पूर्तता करण्यात ते अपयशी ठरले आहेत, असा आरोप विरोधक त्यांच्यावर करीत आहेत.

कोरोना काळामध्ये आजी-माजी खासदार यांचे सुद्धा पुणे-नाशिक रस्त्याच्या श्रेयवादावरून लढाई चालू आहे. मात्र बैलगाडा शर्यत, आदिवासी भागात हिरडा कारखान्याचा प्रश्न, युवकांसाठी शेतीपूरक व्यवसाय, पर्यटन तालुका हि निवडणूक काळातील आश्वासन सध्या कोरोनाच्या  वादळात लुप्त झाली आहेत. याबाबत चकार शब्दही खासदार अमोल कोल्हे करत नसल्याचा आरोप विरोधक करत आहेत. कोरोना महामारीमध्ये खासदार अमोल कोल्हे आमच्यापर्यंत पोहोचले नाहीत, मात्र मा. खासदार शिवाजी आढळराव आमच्यापर्यंत पोहोचून त्यांनी आधार दिला, सहकार्य केले, असे लोकांचे म्हणणे आहे.

सध्या आमदार अतुल बेनके यांचे कट्टर विरोधक शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी एक विरोधक म्हणून तालुक्यात आपली लढाई चालू ठेवली आहे, मात्र राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे त्यांना विरोधक म्हणून टीका करताना मर्यादा पडत असल्याचे दिसून येत आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी कोणत्याही नेत्याकडे असेल तर त्यांनी अर्धी लढाई जिंकलेली असते. सध्या सोशल मीडियावर ‘शेठ आणि दादा’ अर्थात ‘राष्ट्रवादी आणि शिवसेना’ ही लढाई जोरदार चालू असल्याची दिसत आहे. सध्या जुन्नर तालुक्यामध्ये कोरोना काळात सुद्धा या राजकीय लढाईमध्ये  तालुक्यातील कत्तलखाना, ॲम्बुलन्स पाठवणारा देवमाणूस, आमदार निलेश लंके यांचे कोव्हीड सेंटर, स्पीड ब्रेकर, आणि कोरोना अशा अनेक विषयावर कोण कुठे कमी पडला याचे सोशल मीडियावर चांगलेच घमासान चालू आहे. सध्या जुन्नर तालुक्यामध्ये विरोधकांची लढाई चालू आहे. कार्यकर्त्यांचे सोशल मीडिया वॉर चांगलेच रंगले आहे. याच बरोबर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला बाजार भाव नाही, त्यांना उठाव नाही, यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे बळीराजा हताश झाला आहे. अशाच प्रकारे जनतेची कोरोना विरुद्ध लढाई चालू आहे, असे चित्र सध्या जुन्नर तालुक्यामध्ये दिसत आहे. या कोरोना काळात काही व्हाट्सअप ग्रुप, सामाजिक संघटना, काही जागरूक नागरिक वैयक्तिक स्वरूपात मदत करत असल्याचे चित्र दिलासादायक आहे.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!