सिनेस्टाईल पाठलाग करत सुमारे पाच लाख २० हजार रुपयांची दारू व मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
नारायणगाव : पुणे जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने नारायणगाव खोडद रस्त्यावर एका कारचा सिनेस्टाईल पाठलाग करत सुमारे पाच लाख २० हजार रुपयांची दारू व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिलेल्या अवैद्य धंद्यांवर कडक कारवाई करण्याच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक मंगळवार दि.२७/१०/२०२० रोजी नारायणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. यावेळी नारायणगाव-खोडद रस्त्याने एक स्विफ्ट डिझायर गाडी क्र. एम. एच. १२ एल. पी. ९९९६ ही भरधाव वेगाने व संशयास्पद रीत्या खोडद गावच्या दिशेने जाताना दिसली. त्यामुळे या गाडीचा पाठलाग करून हिवरे तर्फे नारायणगाव येथे गाडीला अडवून पथकाने त्यांच्याकडे विचारपूस करत गाडीची पाहणी केली असता, त्यामध्ये विनापरवाना व बेकायदेशीररित्या देशी-विदेशी दारूची वाहतुक करताना आढळल्याने तात्काळ दोन पंचांना बोलावून ४५ हजार ५०४ रुपये किंमतीची दारु व ४ लाख ७५ हजार रुपये किंमतीची स्विफ्ट डिझायर कार असा एकुण ५ लाख २० हजार ५०४ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या घटनेतील आरोपी व मुद्देमाल नारायणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याबाबत पो. नाईक दिपक साबळे यांनी फिर्याद दिली आहे.
निलेश बबन पळसकर वय – ३६ वर्षे, रा. जांबुत ता. शिरूर, जि. पुणे व अरुण कुमार रामप्रसाद राय यादव वय- ३० वर्षे, सध्या राहणार जांबुत, ता. शिरूर, जि. पुणे, मुळ राहणार टूला मगलाहिया, मसरक पूर्व, ता. मसरक जि. छापरा, राज्य – बिहार अशी आरोपींची नावे आहेत.
या दोन्ही आरोपींविरुद्ध नारायणगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा र. नं. ३५७/२०२० मुंबई दारूबंदी कायदा कलम ६५ (अ) (ई), ६७ (क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, पो.ना. दीपक साबळे, पो. हवालदार शरद बांबळे, पो. हवालदार शंकर जम यांचे पथकाने केली.