मास्क नाही, तर माल नाही, प्रांताधिकाऱ्यांचे व्यापाऱ्यांना मुख्याधिकाऱ्यांमार्फत निर्देश…
● मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे प्रांतांचे आदेश..
● चाकण ग्रामीण रुग्णालयात कोविड १९ मोफत लसीकरण सुरू
● प्रांताधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ
महाबुलेटीन न्यूज
चाकण : मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिले. विशेषतः भाजी विक्रेते, दुकानदार, व्यापारी यांच्यावर करडी नजर ठेवण्याची ताकीद देण्यात आली. मास्क नसेल, तर माल मिळणार नाही, अशी भूमिका व्यापाऱ्यांना घेण्याबाबत त्यांनी निर्देश दिले आहेत.
येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड १९ मोफत लसीकरणास सुरुवात झाली असून या उपक्रमाचे बुधवार, दि. १७ मार्च रोजी खेडचे प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
६० वर्ष व त्यापुढील वयाच्या जेष्ठ नागरिकांना तसेच ४५ पेक्षा जास्त वयाच्या मात्र बीपी, डायबेटीस, हायपर टेन्शन, आदी विकार असणाऱ्या दररोज किमान १०० जणांना ही लस देण्यात येणार आहे, अशी माहिती रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. एन. जी. ढवळे यांनी दिली.
यावेळी चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे, महिला लैंगिक शोषण तक्रार निवारण समिती सदस्या मंगलताई देवकर, युवा नेते नितीन गोरे, किशोर जगनाडे, रामदास जाधव, डॉ. जे. के. उनवणे, डॉ. अंकिता इनकर, डॉ. शेख, डॉ. संतोष नायकोडी आदी उपस्थित होते.
जेष्ठ नागरिक पन्हाळे यांना प्रथम लस देऊन या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
—–