Saturday, August 30, 2025
Latest:
खेडजुन्नरपुणे जिल्हाविशेष

महाबुलेटीन न्यूज : चाकण नगरपरिषदेसाठी 65 कोटी व जुन्नर नगरपरिषदेसाठी 14 कोटींच्या पाणी योजनांना राज्याचे नगरविकास व बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली मंजुरी : शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची माहिती

 

महाबुलेटीन न्यूज
चाकण : पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या चाकण नगरपरिषदेसाठी 65 कोटी तर जुन्नर नगरपरिषदेसाठी 14 कोटींच्या पाणी योजनांना राज्याचे नगरविकास व बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिल्याची माहिती शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.

यासंदर्भात माजी खासदार आढळराव पाटील म्हणाले की, “चाकण व जुन्नर या दोन महत्त्वपूर्ण शहरांची वाढती लोकसंख्या व पाण्याची गरज लक्षात घेऊन गेली तीन-चार वर्षांपासून या ठिकाणी पाणी योजनांना मंजुरी मिळावी, याकरिता मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तसेच मंत्रालयातील नगरविकास खात्याचे वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. चाकण शहराला 61 हजार लोकसंख्येचा विचार करून प्रति माणसी दररोज 135 लिटर प्रमाणे पाणीपुरवठा होऊ शकेल यादृष्टीने 65.14 कोटींचे अंदाजपत्रक करण्यात आले. भामा आसखेड धरणातून 2.186 दशलक्ष घनमीटर पाणी उचलण्यासाठी एप्रिल 2019 मध्ये परवानगी घेण्यात आली होती. या कामासाठी स्व. माजी आमदार सुरेशभाऊ गोरे व मी सातत्याने पाठपुरावा केला.”

ते म्हणाले, “जुन्नर शहरासाठी जलाशयातून बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा योजना राबविणे याकामी सुमारे 14 कोटी रकमेचा प्रस्ताव तयार करून मंत्रालयाकडे पाठविण्यात आला. माणिकडोह जलाशयातून पाणी उचलण्याकरिता मंजुरी घेण्यात आली. सदर कामांना तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर राज्याचे नगरविकास बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात दोन्ही नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत भेट घेऊन अंतिम मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू होता. काल दिनांक 3 फेब्रुवारी रोजी याबाबत मंत्रालयामध्ये नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे व वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक संपन्न होऊन शिवसेना पक्षाची सत्ता असलेल्या दोन्ही नगर परिषदेतील महत्वपूर्ण पाणी योजनांना मंजुरी मिळाली आहे स्व. आमदार सुरेश भाऊ गोरे व मी निवडणूक काळामध्ये चाकणकरांना दिलेला शब्द पूर्ण करू शकलो याचे मनापासून समाधान आहे.”

या योजनांना मंजुरी मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेना शिरूर लोकसभा मतदार संघाच्या वतीने माजी खासदार आढळराव पाटील यांनी विशेष आभार व्यक्त केले. या योजनांना मंजुरी मिळावी यासाठी प्रयत्न केलेले स्व. माजी आमदार सुरेश गोरे, जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे, चाकण व जुन्नर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांचे शिवसेना उपनेते, माजी खासदार आढळराव पाटील यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!