Friday, April 18, 2025
Latest:
खेडपुणे जिल्हाविशेष

चाकण एमआयडीसी फेज २ मध्ये वासुली फाटा येथे नव्याने पोलीस चौकी उभारण्याची स्व. तानाजीभाऊ केंदळे प्रतिष्ठाणची मागणी

 

महाबुलेटीन न्यूज
चाकण एमआयडीसी : येथील फेज २ मध्ये वासुली फाटा ( खेड ) येथे पोलीस चौकी करण्याची मागणी स्व. तानाजीभाऊ केंदळे प्रतिष्ठाण व सभापती, नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांनी केली आहे. 

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीतील चाकण पोलीस स्टेशन अंकित म्हाळुंगे पोलिस चौकी आता नव्याने म्हाळुंगे पोलीस स्टेशन म्हणून येत्या महिन्यात होत आहे. यापूर्वी पिंपरी चिंचवडचे तत्कालीन पोलीस आयुक्त बिष्णोई यांच्याकडे देखील पोलीस चौकीचे मागणी कायम होती. सध्या पोलीस स्टेशन होत असताना पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या चाकण टप्पा क्र.२ हा भाग महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने व्यापलेला आहे. या भागात मोठी औद्योगिक वसाहत तसेच अनेक कंपन्यामध्ये काम करणारे कामगार या भागात आपले जीवन जगत आहे.

या भागाची व्याप्ती खूप मोठी असून सहा गावे मिळून चाकण टप्पा क्र. २ उभारला आहे. यातच म्हाळुंगे पोलिस चौकीची व्याप्ती मोठी असल्याने या सर्व गावांच्या मध्यभागी वासुली फाटा या ठिकाणी बाजार पेठ भरते, याठिकाणी पोलिस चौकी उभारणे गरजेचे आहे, अशी मागणी प्रतिष्ठानने केली आहे.

या भागातून जाताना शेतकरी, ग्रामस्थ, नागरिक, विद्यार्थी वर्ग, महिला तसेच बाहेरून आलेला कामगार वर्ग यांचा वावर जास्त प्रमाणात दिसून येतो. याचा फायदा घेत काही गुंड, लुटारू, चोर इ. स्थानिकांना त्रास देतात, यामुळे दिवसेंदिवस गुन्हेगारीत वाढ होत आहे आणि यातूनच मोठे गुन्हे घडण्याची शक्यता निर्माण होते, म्हणून पोलीस चौकी उभारली तर निश्चितच या बाबींवर आळा बसेल.

वासुली फाटा या ठिकाणी जर नव्याने पोलिस चौकी उभारण्यात आली तर साहजिकच शिंदे, वासुली, वराळे, भांबोली, सावरदरी, खालुंब्रे, शेलु, आसखेड, करंजविहिरे, शिवे आणि पश्चिम भागातील सर्व गावांसाठी महत्वाचे ठिकाण आणि सध्याची सर्वात मोठी बाजारपेठ वासुली फाटा आहे. त्यामुळे याभागातील शेतकरी, ग्रामस्थ व गावकरी बांधव यांच्या काही तक्रारी असल्यास त्यांना पोलीस चौकी जवळ उपलब्ध होईल आणि पोलिसांना सुद्धा त्यांचे काम करण्यास सोयीस्कर होणार आहे.

पूर्वी तक्रार देण्यासाठी चाकण येथे जावे लागायचे, तर सध्या म्हाळुंगे येथे या भागातील ग्रामस्थांना जावे लागते, नवीन चौकी झाल्यास याभागाचा कायमचा प्रश्न सुटणार आहे, म्हणून पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडे वासुली फाटा या ठिकाणी पोलीस चौकी नव्याने उभारण्यात यावी, अशी मागणी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!