बिबटयाच्या हल्ल्यात घोडी ठार
कवठे येमाईच्या मुंजाळवाडीतील घटना
पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
शिरूर ( दि. ८ सप्टेंबर ) : शिरूर तालुक्याच्या बेट भागात बिबटयाची दहशत कायम असून काही दिवसांपुर्वी सविंदणे येथे दहा बोकडांना ठार मारले होते. आता कवठे येमाईच्या मुंजाळवाडी येथील भगवान शंकर हिलाळ यांची ६ वर्षे वयाची घोडी बिबट्याने हल्ला केल्याने ठार केल्याची घटना घडली आहे. मागील दोन तीन महिन्यांपासून या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असून दिवसा सुद्धा बिबट्याचे दर्शन शेतकऱयांना होत आहे. या परिसरात मानवी वस्ती, जनावरे यांचे वास्तव्य असल्याने बिबट्याची दहशत पहाता वनविभागाने तत्परतेने पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ऊस, बाजरी ही पिके आहेत. त्यामुळे बिबट्याला लपण्यासाठी पुरेशी जागा निर्माण झाली आहे. सध्या सविंदणे, कवठे परिसरात बाजरी काढण्याचे काम चालू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीकाम करताना काळजी घ्यावी, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी केले आहे.
वनविभागास या घटनेची माहिती देतातच वन कर्मचारी हनुमंत कारकूड यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे. नागरिकांची या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी लक्षात घेता आजच पिंजरा लावण्यात येणार असल्याचे वनपाल चारुशीला काटे व वन कर्मचारी हनुमंत कारकूड यांनी सांगितले.
—