भात उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शन
महाबुलेटीन न्यूज : दत्ता घुले
शिंदे-वासुली : खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील भात पिकांवर करपा रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. तत्काळ भात पिकावर उपाययोजना करण्यासंबंधी खेडच्या कृषी विभागाकडून भात उत्पादक शेतकऱ्यांना करंजविहिरे (ता.खेड) येथे मार्गदर्शन करण्यात आले.
खेडचा पश्चिम भाग हा भाताचे आगार म्हणून ओळखला जातो. येथील शेतकऱ्यांचे वर्षातील भात हेच मुख्य पीक आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी अनेक प्रकारच्या भाताच्या रोपांची लागवड केली. पिकाच्या लागवडीनंतर जुलै अखेर व ऑगस्ट महिन्यात झालेल्या चांगल्या पावसाने भातपीक जोमदार वाढले. सध्याच्या सप्टेंबर महिन्यात भातपीक हे पोटरी अवस्थेत असून लवकरच भातओंब्या निसवणीस लागतील.तर काही ठिकाणी आगाप लागवडीचे भातपीक निसवण्याच्या अवस्थेत आहे. सध्यातर पश्चिम भागातील भाताचे पीक चांगले जोमदार असताना काही ठिकाणी करपा व कडा करपा रोगाचा पिकावर प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पिकाला धोका होऊन कमी उत्पादन निघण्याची शक्यता आहे, म्हणून यावर लवकर उपाययोजना करण्यासंबंधी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
उपविभागीय कृषी अधिकारी मनोज ढगे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब मांदळे यांनी पश्चिम भागातील भात पिकांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी भात पिकावर असलेल्या करपा रोगावर पाण्यात औषध मिसळून फवारणी करण्याच्या सूचना केल्या. तसेच शेतकऱ्यांना औषधांची मात्रा सांगितली. जास्त करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यावर दर दहा पंधरा दिवसांनी पिकावर २ किंवा ३ फवारणी करण्याचा महत्वपूर्ण सूचनाही यावेळी शेतकऱ्यांना केल्या. यावेळी शेतकरी गोरक्षनाथ शिवेकर, एकनाथ कोळेकर, बाळू शिवेकर आदी शेतकऱ्यांना मार्गदर्शन कृषी विभागाकडून करण्यात आले.
यावेळी पाईट कृषी मंडळ अधिकारी विजय पडवळ, कृषी पर्यवेक्षक माणिक वाळे, एम.एम.शेख, प्रवीण शिंदे, कृषी सहाय्यक जालिंदर मांजरे आदी उपस्थित होते.
———————