Saturday, August 30, 2025
Latest:
खेडपुणे जिल्हाविशेष

भाजीपाला महागला, गृहिणींचा त्रागा वाढला..

महाबुलेटीन न्यूज : प्रभाकर जाधव  
राजगुरूनगर : ऐन सणासुदीचे दिवस सुरु झाले अन लॉकडाऊनमुळे आर्थिक बजेट कोलमडून गेले. आणि या विस्कटलेल्या संसार वेलीवर आफतच आली. 
पितृपंधरवड्यामुळे भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले होते व तेे अद्याप टिकून आहेत. 

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे आर्थिक टंचाई भासत असून त्यात महागाईने सर्वसामान्यांना जीवन नकोसे झाले आहे. भाजी मंडईत जायचे म्हटले तरी अंगावर काटा उभा रहातो. शंभर रुपयाची नोट मोडली तर अवघ्या तीन-चार भाज्या कशा – बशा येत आहेत. किराणा मालासह भाजीपाल्याचे दर ‘ तिखट ‘ झाल्याने सर्वसामान्यांना दररोजची रोजीरोटी महाग झालीआहे. त्यामुळे दररोजच्या जेवणात सर्वसामान्यांना चटणी-भाकरी खाण्याची वेळ आली आहे.

भाजीपाला शिजवण्यास लागणाऱ्या इंधनाच्या
दराने ‘ गगनभरारी ‘  घेतली असल्याने गृहिणींचे बजेट पूर्णपणे कोलमडून पडले आहे. गणेशोत्सव झाल्यानंतर प्रथेप्रमाणे पितृपंधरवडा येतो. यामध्ये आपल्या पूर्वजांना जेऊ घालण्याची प्रथा आहे. यासाठी फळे व भाजीपाल्याचीही गरज भासते. त्यात भाज्यांना वाढती मागणी असल्याने त्याचे दरही कमालीचे वाढले आहेत. संपुर्ण पितृ पंधरवड्यात भाज्यांचे दर गगनाला भिडले. भाजीपाल्याच्या पावशेरचा दर वीस ते तीस रुपयांच्या पुढे पोहोचला असल्याने गृहिणी
अक्षरशः मेटाकुटीस आल्या आहेत. स्वयंपाक घरात विविध खाद्यपदार्थामध्ये कांद्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.
गेल्याकाही दिवसांपासून या कांद्याने अक्षरशः रडवले आहे. ३० ते ४० रुपयां पर्यंत कांदा गेल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. कांद्याच्या या दरवाढीने गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणले आहे.

पूर्वीशंभर रुपयांची नोट मोडली की पिशवी भरून भाजीपाला घरी न्यायचे दिवस आत्ताच्या महागाईच्या काळात मागे सरले आहेत. आत्ता पिशवी भरायला तीनशे ते चारशे रुपये मोजावे लागतात. दिवसें दिवस वाढणाऱ्या या महागाईमुळे  १०० रुपयात पिशवीचा तळही झाकत नाही, अशी स्थिती निर्माण झालीआहे. त्यामुळे भाजीपाल्याचा दर चांगलाच कडाडला असल्याने सर्वसामान्यांचे जीवन जगणे असह्य झाले आहे.

# असे आहेत भाजीपाल्याचे दर ! 
मेथी २० रुपये जुडी, कोथिंबीर वीस रुपये जुडी, भेंडी ६०  रुपये किलो, गवार ८० रुपये किलो, 
भोपळा फोड २५ रुपये, 
देठ २० रुपये,  टोमॅटो ६० रुपये किलो, लसून २०० रुपये किलो, 
अळु तीन पानांची जुडी २० रुपये,  कारले ८० रुपये किलो, मिरची ८० रुपये किलो,
काकडी ६० रुपये किलो, आल्यासाठी किलोला १०० रुपये मोजावे लागतआहेत. कांदा काही चाळीशीच्या आत यायला तयार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!