बेंटली सिस्टम इंडिया तर्फे आंबेगाव वसाहत विद्यालयाला पाच लॅपटॉपची भेट
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
घोडेगाव : शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमाअंतर्गत बेंटली सिस्टम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय आंबेगाव वसाहत, ता. आंबेगाव, जि. पुणे या शाळेला पाच लॅपटॉपची भेट दिली असल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश ठाकूर यांनी दिली.
बेंटली इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांच्या तर्फे स्टेम ग्रँट डोनेशन द्वारा सॉफ्टवेअर अभियंता स्वप्नील कानडे व सुचिता माळगावकर यांच्या विशेष सहकार्याने यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय आंबेगाव वसाहत ता. आंबेगाव, जि. पुणे या शाळेला पाच लॅपटॉपची भेट देण्यात आली. सदर लॅपटॉप मध्ये ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी ई शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ऑनलाईन शिक्षण सर्वच विद्यार्थ्यांना घेता येत नाही कारण काही ठिकाणी मोबाईल रेंज उपलब्ध होत नाही. दुर्गम भागातील कोटमदरा, कोळवाडी, पिंगळवाडी या गावातील विद्यार्थ्यांना या लॅपटॉप मुळे शिक्षणाचा आनंद घेता येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना ई लर्निंग शिक्षणासाठी मोठा हातभार लागणार आहे.
सदर लॅपटॉपचे वितरण साने गुरुजी कथामाला पुणे जिल्हा ग्रामीण समिती व ज्ञानलक्ष्मी राष्ट्रीय विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब कानडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी किरण ननावरे (सॉफ्टवेअर इंजिनिअर), नितेश भताडे, विद्यालयातील शिक्षिका वैशाली काळे, मनीषा आढळराव, वंदना मंडलिक, कविता ढेरंगे, तसेच शिक्षक जालिंदर देशमुख व गरजू विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनंता लोहकरे यांनी केले, तर सुरेश अरगडे यांनी सर्वांचे आभार मानले.