बापूजीबुवा मंदिराजवळील टर्न धोकादायक
अपघाताची शक्यता, वळण सरळ करण्याची मागणी
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
घोटावडे : माण-पौड रोडवरील बापुजीबुवा मंदिराजवळ असलेल्या धोकादायक वळणावर उंच झाडांमुळे समोरून येणारी वाहने दिसत नसल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने त्वरित दखल घेतली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजप नेते रामचंद्र देवकर यांनी दिला आहे.
मंदिरालगत दोनशे ते तीनशे फुटापर्यंत समोरून येणारी गाडीच दिसत नाही. याठिकाणी झाडे मोठी झाल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. संबंधित प्रशासनाने या ठिकाणची प्रत्यक्ष पाहणी करून मोठी झाडे तोडून किंवा त्यांची छाटणी करून हा धोकादायक कॉर्नर साफ करावा, तसेच मंदिराजवळ गतिरोधक टाकण्याची मागणी भाजप नेते रामचंद्र देवकर यांच्यासह अशी मागणी मुळशीकर नागरिक व वाहन चालकांनी केली आहे. या ठिकाणी असलेले धोकादायक वळण सरळ करण्याचीही मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
“दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी माझ्या गाडीला मोठा अपघात झाला असता, सुदैवाने काही घटना घडली नाही, परंतु भविष्यात याठिकाणी वाहनांचा अपघात होऊ शकतो, तरी प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन ह्या धोकादायक वळणाची पाहणी करावी, व याबाबत कार्यवाही करावी. तसेच वाहनचालकांनी ह्या वळणावर वाहने सावकाश चालवावीत.
— रामचंद्र देवकर, भाजप नेते, मुळशी तालुका